औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या ९ महिन्यांनंतर विमानसेवेला प्रवासी संख्येचे बूस्टर मिळाले आहे. औरंगाबादच्याविमान प्रवाशांच्या संख्येत अवघ्या २ महिन्यांत दुपटीने वाढ झाली आहे. शहरात महिनाभरातील विमानाच्या प्रवासी संख्येने ९ हजारांवरून २० हजारांवर झेप घेतली आहे.
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे तब्बल ३ महिने देशातील विमानसेवा बंद होती. औरंगाबादहून सर्वप्रथम १९ जूनपासून इंडिगोने दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली ही विमानसेवा सुरू केली. त्यानंतर एअर इंडियाचेही उड्डाण सुरू झाले. सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून औरंगाबाद दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला हवाई सेवेने जोडले गेले आहे. हैदराबादपाठोपाठ आता १६ डिसेंबरपासून बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराची दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या ३ महिन्यांनंतर विमानसेवा सुरू केल्यानंतर प्रारंभी जूनच्या १२ दिवसांत अवघ्या ४८९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे कंपन्यांनी विमानाच्या फेऱ्याही घटविल्या होत्या; परंतु जुलै महिना सुरुवात होताच विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली.
प्रत्येक महिन्यात प्रवाशांची संख्या उत्तरोतर वाढतच गेली. सप्टेंबर महिन्यात विक्रमी ९ हजार ३६३ प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. अवघ्या २ महिन्यांत नोव्हेंबरमध्ये प्रवासी संख्येत दुप्पट वाढ झाली. या महिन्यात २० हजार ४३८ प्रवाशांनी औरंगाबादहून विमान प्रवास केला.त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, की, औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी संख्येत वाढ होत आहे. ही समाधानकारक बाब आहे.
विमानसेवा वाढीसाठी प्रयत्नविमानतळ प्राधिकरण आणि इतर सदस्य औरंगाबादहून अन्य शहरांसाठी विमानसेवा सुरू होईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रवाशांचा सुरक्षित विमान प्रवासावर विश्वास वाढत आहे. - डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ
विमान प्रवाशांची संख्या४८९ जून ३,४९९ जुलै ६,१७६ ऑगस्ट ९,३६३ सप्टेंबर१५,०५९ ऑक्टोबर२०,४३८ नोव्हेंबर