औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी १८२ एकरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. १८ जानेवारीपासून धावपट्टी रुंदीकरणासाठी भूसंपादन अनुषंगाने संयुक्त मोजणी सुरू झाली आहे. एका आठवड्यात मोजणी आणि मार्किंग पूर्ण करण्यात येणार असून, यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाने आधुनिक यंत्रे आणली आहेत. क्वार्स या यंत्राच्या आधारे मोजणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.ने मोजणीसाठी तीन लाख ५१ हजार रुपये ऑक्टोबर २०२०मध्ये भूमिअभिलेख कार्यालयास जमा केल्यानंतर सोमवारी प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली आहे. मुकुंदवाडीतील १३, १५, १६, १८, २६, २७, मूर्तजापूरमधील ३४, ३०, ३१ या गटातील तर चिकलठाणा येथील गट नं. ४१०, ४१४, ४१५, ४१६, ४१७ आणि ५५५ मध्ये मोजणी होत आहे. मोजणीअंती प्रत्यक्ष सीमांकन पाहण्यात करण्यात येत आहे. सध्या विमानतळाची धावपट्टी नऊ हजार ३०० फूट म्हणजेच दाेन हजार ८३५ मीटर आहे. १२ हजार फुटांपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून, २७०० फुटांसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने करण्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे आला आहे. पहिल्या टप्प्यात १५५ एकर, दुसऱ्या टप्प्यात साडेतीन एकर, तिसऱ्या टप्प्यात दोन एकर आणि चौथ्या टप्प्यात २० एकर असा १८२ एकर संपादित करण्याचा प्रस्ताव सध्या समोर आलेला आहे.
भूसंपादनाचा मावेजा अद्याप ठरलेला नाही७/१२ भूमिअभिलेख कार्यालयाकडे आल्यानंतर संयुक्तरीत्या जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला मोठी रक्कम लागेल. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने होणार असून, यासाठी किती रक्कम द्यावी लागेल, हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.