- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)
औरंगाबाद धान्य बाजारपेठेत मागील आठवड्यात गडचिरोली व कर्नाटकहून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांना दिलासा म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी व डाळींचे भाव स्थिर होते.
औरंगाबादेतील धान्य बाजारपेठेत परपेठेतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली. यात गडचिरोली येथील एचएमटी, बीपीटी तांदळाचा समावेश आहे. तसेच कर्नाटक राज्यातूनही तांदळाची आवक सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातून आलेला एचएमटी तांदूळ ४२०० रुपये तर बीपीटी तांदूळ ३००० रुपये प्रतिक्ंिवटल विक्री होत आहे. मागील वर्षी सुरुवातीला या तांदळाचे हेच भाव होते. कर्नाटकमधून आलेल्या नवीन तांदळाचे भाव ३१०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात विविध राज्यांतील नवीन तांदूळ स्थानिक बाजारात दाखल होईल. जानेवारी महिन्यात तांदळाच्या ५० ते ७० प्रकारच्या व्हरायटी दाखल होतील.
मागील दोन ते तीन वर्षांच्या खंडानंतर चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उत्तर प्रदेशातील नवीन बाजरी बाजारात दाखल झाली होती. यामुळे बाजरीचे भाव १०० रुपयांनी उतरून २००० ते २२५० रुपये प्रतिक्ंिवटल विक्री झाली. उत्तर प्रदेशातील बाजरीची आवक आणखी वाढल्यास भाव आणखी कमी होतील, अशी शक्यता होलसेल विक्रेत्यांनी व्यक्त केली. मात्र, मागील आठवड्यात बाजरीचे भाव स्थिर होते.
दुष्काळामुळे ज्वारीची पेरणी कमी झाल्याने ज्वारीचे भाव २६५० ते ३५०० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे व्यापाऱ्यांनी शेजारील कर्नाटक राज्यातून नवीन ज्वारी बाजारात विक्रीला आणली. मागील आठवड्यातही १ हजार क्ंिवटल ज्वारीची आवक झाली. २४०० ते २७०० रुपये प्रतिक्ंिवटलदरम्यान ज्वारीचे भाव स्थिर होते. गव्हाची पेरणी कमी असल्याने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतून येणाऱ्या गव्हावरच अवलंबून राहावे लागणार आहे. गव्हाचे भावही मागील आठवड्यात स्थिर होते.
मध्यंतरी डाळींच्या भावात मोठी वाढ झाली. मात्र, उठाव घटल्याने डाळींच्या भाववाढीला लगाम लागला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात डाळींचे भाव स्थिर होते. हरभरा डाळ ५९०० ते ६१०० रुपये प्रतिक्ंिवटल, तूर डाळ ६००० ते ६३०० रुपये, उडीद डाळ ४००० ते ५२०० रुपये, मूग डाळ ६८०० ते ७३०० रुपये तर मसूर डाळ ४९०० ते ५२०० रुपये प्रतिक्ंिवटलवर स्थिर होते. औरंगाबाद जाधववाडी येथील अडत बाजारात येणाऱ्या मक्याची आवक संपुष्टात आली आहे.
दुष्काळामुळे पेराच कमी असल्याने ज्वारी, गव्हाच्या पिकावर याचा परिणाम होणार असून फेब्रुवारी महिन्यात ज्वारी, गव्हाची आवक किती होईल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक आवकवर अवलंबून असलेल्या अडत बाजारातील व्यवहार बंद पडायच्या मार्गावर आहे. यापुढील सर्व मदार परपेठेतील आवकवर अवलंबून राहणार असल्याचे येथील व्यापाऱ्यांली सांगितले.