औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापकांच्या संशोधनाला वाव देण्यासाठी ३३ प्राध्यापकांना संशोधन प्रकल्पांना ४२ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. प्रकल्प मंजुरीचे आणि १ जानेवारीपासून संशोधन सुरू करण्यासंदर्भात पत्र विद्यापीठाने नववर्षाच्या पूर्वसंध्येला संशोधक प्राध्यापकांना दिले. हे प्रकल्प प्राध्यापकांना २ वर्षांत पूर्ण करावे लागणार आहेत. एप्रिलमध्ये दुसऱ्या टप्प्यात आणखी प्राध्यापकांना संशोधनासाठी निवडून विद्यापीठ फंडातून संशोधन निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची एनआयआरएफ रँकिंग वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’मार्फत विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पांचे प्रस्ताव मागवले होते. या सेलचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर हे संचालक आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत प्राध्यापकांचे ५७ प्रस्ताव आले होते. अकरा जणांच्या तज्ज्ञ समितीने छाननीत २ प्रकल्प बाद करून ५५ प्रकल्पांचे सादरीकरण ५ आणि ६ डिसेंबर रोजी झाले. समाजाला संशोधनाचा उपयोग व संशोधनाच्या पुढील संधी विचारात घेऊन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या २८ पैकी १८, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ११ पैकी ६, मानव्य विद्याशाखेच्या १६ प्रस्तावांपैकी ९ अशा एकूण ३३ प्रकल्पांची निवड विद्यापीठ फंडातून निधी मंजूर करण्यासाठी करण्यात आली.
त्यांना अनुक्रमे २८.१० लाख, ५.१० लाख आणि ९.०५ लाख रुपये असा एकूण ४२.२५ लाखांचा निधी संशोधनासाठी दिला जाणार आहे. हा खर्च विद्यापीठ फंडातून दिला जाणार असून, या निधीतून संशोधनपूरक साहित्य, सामग्री खरेदी करण्यासाठीही गाइड लाइन्स ठरवून देण्यात आल्या आहेत. पेनड्राइव्ह, लॅपटाॅपसारखे गॅझेट या निधीतून घेता येणार नाहीत, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
दुसरा टप्पा एप्रिलमध्ये
३३ प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पांना ७० हजार ते ३ लाखांपर्यंत निधी मंजूर केल्याचे पत्र दिले आहे. या संशोधनाला १ जानेवारीपासून सुरुवात होईल. ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षांत हे संशोधन पूर्ण करणे अपेक्षित आहे. मोठ्या संशोधन प्रकल्पांना संशोधन फंडिंगसाठी राष्ट्रीय एजन्सीकडे पाठवले आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवड ही एप्रिलमध्ये करून प्राध्यापकांना संशोधनाला प्रोत्साहन देऊ.
- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद