औरंगाबाद : आपल्या मुलामुलीच्या लग्नाच्या वेडिंग डेस्टीनेशनसाठी थायलंड, गोवा, केरळ, राजस्थानचा विचार करत असाल तर जरा थांबा. आता तुम्हाला पर्यटनाची राजधानी औरंगाबादेतच ‘वेडिंग डेस्टीनेशन’ उपलब्ध होणार आहे. शहरापासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर मौजे पुरी या गावात तब्बल २६ एकरावर ‘मंगलम वेडिंग डेस्टीनेशन क्लब’ उभे राहत आहे. उल्लेखनीय म्हणजे देशात अनेक ‘वेडिंग डेस्टीनेशन’ आहेत, पण हे क्लब स्वरूपात भारतातील पहिले ‘वेडिंग डेस्टीनेशन क्लब’ ठरणार आहे.
पर्यटनाची राजधानी औरंगाबादेत जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेणी, देवगिरी किल्ला, बिबीका मकबरा, पानचक्की, औरंगाबाद बुद्ध लेणी, यांसारख्या ऐतिहासिक वास्तू सर्वांना मोहित करतात. वेरुळ, खुलताबाद, पैठण, कचनेरमुळे या जिल्ह्याकडे आध्यात्मिक पर्यटकांचा ओढा असतोच. शिवाय येथे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहेच. असे म्हटले जाते की, समुद्र सोडला तर या जिल्ह्यात पर्यटनासाठी लागणाऱ्या सर्व निसर्गनिर्मित, मानवनिर्मित गोष्टी येथे आहेत. समुद्राची कमतरता जायकवाडी धरणाने काही प्रमाणात भरून काढली आहे.
एवढेच नव्हे तर ऑटोमोबाईल हब म्हणूनही हेच शहर संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरले आहे. डीएमआयसी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीने शहरात नवऊर्जा निर्माण केली आहे. पुण्यानंतर आता औरंगाबाद शैक्षणिक हब बनले आहे. नामवंत हॉस्पिटलमुळे मेडिकल टुरिझमही वाढत आहे. एक शांत व निवांत व शानदार शहरात कमी होती ती ‘वेडिंग डेस्टीनेशन’ची. यामुळे पर्यटनाची राजधानी सोडून वेडिंग डेस्टीनेशनसाठी येथील लोक थायलंड, केरळ, राजस्थान (जयपूर), अंदमान, निकोबार द्वीप समूह किंवा पुणे येथील लवासा येथे जात आहेत. पर्यटनाची राजधानी असे बिरुद मिरविणाऱ्या औरंगाबादेकडे वेडिंग डेस्टीनेशन म्हणून कोणी पाहत नव्हते. मात्र, आपल्या शहरात एवढी निर्सगाने दिलेली समुद्धी आहे, एवढे पोटेन्शीयल आहे की, या जिल्ह्यात ‘वेडिंग डेस्टीनेशन’ होऊ शकते अशी संकल्पना येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शिरीष गादीया यांच्या मनात आली. याच संकल्पनेतून ‘मंगलम वेडिंग डेस्टीनेशन क्लब’ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. ही औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याच्या दृष्टीने गौरवाची बाब होय. जेव्हा हे वेडिंग डेस्टीनेशन उभे राहील तेव्हा औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल.