औरंगाबाद : शहरातील वैद्यकीय सेवेचा गेल्या काही वर्षांत विस्तार झाला असून, खाजगी रुग्णालयांची संख्या ४५८ वर गेली आहे. गेल्या ४ वर्षांत ७७ नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या उपचार पद्धतीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज राहिलेली नाही. औरंगाबाद हे आता मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे.
शहराची लोकसंख्या १६ लाखांच्या वर गेली आहे. शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांवरही नागरिकांचे आरोग्य अवलंबून आहे. आरोग्यसेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु ही मूलभूत गरज भागविण्यासाठी आणि अधिकार मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शहरात छावणी रुग्णालय आहे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. आता जिल्हा सामान्य रुग्णालयदेखील सुरू झाले आहे. महापालिकेची ३४ आरोग्य केंद्रे आहेत. या सगळ्यातही खाजगी रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. प्रत्येक वर्षी नव्या रुग्णालयाची भर पडत आहे.
शहरातील जालना रोडलगत गेल्या काही वर्षांत खाजगी रुग्णालयांची संख्या वाढली आहे. चिकलठाणा ते भगवान महावीर चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खाजगी रुग्णालये उभी राहिली आहेत. जालना रोडपाठोपाठ बीड बायपासवरदेखील ठिकठिकाणी नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्ये असलेल्या रुग्णालयांच्या शाखाही औरंगाबादेत सुरू करण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रसूतिशास्त्र, अस्थिव्यंगोपचारासह हृदयविकार, मूत्रपिंडविकार, मेंदुविकार, पोटाचे विकार यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालये कार्यान्वित झाली आहेत.
८ महिन्यांत १९ नवीन रुग्णालयेशहरात यावर्षी एप्रिलपासून आतापर्यंत म्हणजे अवघ्या ८ महिन्यांत १९ नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. शहरातील सध्या कार्यरत असलेल्या एकूण खाजगी रुग्णालयांची संख्या ४५८ इतकी झाली आहे. या सर्व खाजगी रुग्णालयांतील एकूण खाटांची संख्या ८ हजार ८१२ इतकी आहे. म्हणजे एवढे रुग्ण खाजगी रुग्णालयांत दाखल असतात. केवळ बाह्यरुग्णसेवा देणारी रुग्णालये आणि लॅबची संख्या १,७०० च्या घरात आहे.
नवीन रुग्णालयांची नोंदवर्ष संख्या२०१६-१७ ४२०१७-१८ ३७२०१८-१९ १७२०१९-२०(आजपर्यंत) १९एकूण ७७
योग्य शुल्कात उपचार मिळावेतशहरात दरवर्षी नवीन रुग्णालये सुरू होत आहेत. मराठवाड्यातून लोक उपचारासाठी शहरात येतात. रुग्णालयांमध्ये योग्य पद्धतीने उपचार मिळावेत. सर्वसामान्य रुग्णांना योग्य शुल्कात उपचार मिळाले पाहिजे. -डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा