औरंगाबाद : राष्ट्रवादीचे ( NCP ) आमदार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी अंडरवर्ल्डसोबत मिळून करोडोंची जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांचे गुन्हेगारांशी संबंध उघड झाले आहेत, त्यांची राज्य मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी भाजप (BJP) युवा मोर्चाने आज दुपारी क्रांती चौकात आंदोलन केले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी मंत्री नवाब मलिक यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.
आज सकाळी मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावण्यात आली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी केले. यानंतर भाजपमधून मलिक यांच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. विविध शहरात भाजप युवा मोर्चाने आक्रमक आंदोलन करत गुन्हेगारांशी संबंध असल्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
शहरातील क्रांती चौक येथे भाजपने धरणे आंदोलन केले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी नवाब मलिक यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. नवाब मलिक यांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत. त्यांनी अंडरवर्ल्डसोबत हात मिळवणी करून करोडोंची मालमत्ता जमा केली आहे. राज्य शासनाच्या आडून त्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिले आहे असा आरोप यावेळी भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला. मंत्री मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. नवाब मलिक यांच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष राजगौरव वानखेडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.