औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदेंच्या अनेक जागा या भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाच्या विरोधामुळे पेचात अडकलेल्या आहेत. खुद्द श्रीकांत शिंदे यांची जागा फडणवीसांच्या मुखातून वदवून घ्यावी लागली आहे. अशातच महत्वाची जागा असलेली छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये देखील भाजपाचा विरोध सुरु झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या विनोद पाटलांच्या समर्थनार्थ भाजपचे नगरसेवक एकवटले आहेत. तर या नगरसेवकांचा संदीपान भुमरे यांना विरोध असून त्यांना उमेदवारी दिली तर पुढची भूमिका आम्ही ठरवू असा इशारा माजी उपमहापौरांसह भाजपाच्या ८ नगरसेवकांनी दिले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. विनोद पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या पाटलांच्या समर्थनार्थ हे नगरसेवक मैदानात उतरले आहेत. यावेळी ही जागा शिंदे गटाला जाणार असेल तर विनोद पाटलांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे व इतर नगरसेवकांनी ही मागणी केली आहे.