औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्तीप्रकरणी भाजपमधील अंतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे. व्यवस्थापन परिषदेऐवजी अधिसभेवर नेमणूक झाल्याचा राज्यपाल कार्यालयाचा मेल येताच शिरीष बोराळकर यांनी आवघ्या पाच मिनिटांतच राज्यपालांना राजीनामा सादर केला. शिवसेनेला मिळालेल्या एका जागेवरही मागील २० वर्षांपासून काम करणार्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नसल्यामुळे नाराजी पसरली.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांना विशेष अधिकार असतात. या पदावर वर्णी लागण्यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. सर्वांत अगोदर संघ परिवारातील प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी या पदासाठी विद्यापीठाशी संबंधित असलेल्या शिक्षण संस्थांच्या पदाचा राजीनामा दिला होता. डॉ. ठोंबरे यांचे नाव मागे पडल्यानंतर बीड भाजपचे अध्यक्ष रमेश पोकळे यांच्या नावाची चर्चा सुुरू झाली. मात्र, डॉ. गजानन सानप यांच्या नेतृत्वात विद्यापीठ विकास मंचने निवडणूक लढवली. यात त्यांना निवडणुकीला उभे राहू नये, असे आदेश होते. त्यांची वर्णी व्यवस्थापन परिषदेवर लावण्याचा शब्द देण्यात आला. मात्र, त्यांची शेवटपर्यंत डाळ शिजली नाही.
यातच श्रेयश इंजिनिअरिंग कॉलेजचे सर्वेसर्वा व भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांमार्फत जोर लावला. त्यांनाही यात अपयश आले. तेव्हाच पदवीधर मतदारसंघाचे पराभूत उमेदवार शिरीष बोराळकर यांचे नाव आगामी पदवीधरची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अंतिम करण्यात आले होते. याची माहिती विद्यापीठ आणि भाजप वर्तुळात येताच त्यांचा पत्ता कट करण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रणा कार्यरत झाल्या होत्या.
या कुरघोडीच्या राजकारणात राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या नियुक्त्या लांबणीवर पडल्या. अधिसभेवरील १० सदस्यांपैकी ५ सदस्य जाहीर करण्यात आले. यातही काँग्रेसचे डॉ. जितेंद्र देहाडे यांनी बाजी मारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. शुक्रवारी विद्यापीठाला आणखी तीन अधिसभा सदस्य आणि एक व्यवस्थापन परिषद सदस्यांची नावे प्राप्त झाली आहेत. यात व्यवस्थापन परिषदेवर किशोर शितोळे यांची वर्णी लागली, तर अधिसभा सदस्यपदी शिरीष बोराळकर, पंकज भारसाखळे आणि शिवसेनेच्या कोट्यातून अॅड. विजय सुबुकडे पाटील यांची निवड झाली. व्यवस्थापन परिषदेऐवजी अधिसभा सदस्यपदी नियुक्ती झाल्याचा मेल येताच शिरीष बोराळकर यांनी राज्यपालांना राजीनामा पाठविला आहे. यामुळे भाजपतील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.
प्रकुलगुरूनंतर पुन्हा दानवेची बाजीविद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी समर्थक डॉ. अशोक तेजनकर यांची वर्णी लावण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यात ‘अभाविप’चे संंबंधित असलेले डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांचा पत्ता कट करण्यात आला होता. यावेळी व्यवस्थापन परिषदेवर किशोर शितोळे यांची नियुक्ती करीत दानवे यांनी बाजी मारली आहे.
शिवसेनेतही मारली दुसर्यानेच बाजीशिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर अॅड. विजय सुबुकडे पाटील यांची नियुक्ती झाली. मात्र, विद्यापीठात मागील २० वर्षांपासून शिवसेनेची बाजू सांभाळत असलेले तुकाराम सराफ यांचे नाव ऐनवेळी कापण्यात आले. ‘मातोश्री’च्या पातळीवरील राजकारणात तुकाराम सराफ कमी पडले. याविषयी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली नाही. पक्ष देईल तो निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितले.