औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने दररोज ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. परिणामी रुग्णांसाठी दररोज ५४ टन ऑक्सिजन लागत आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी रोज १५ टन ऑक्सिजन लागत होते. परंतु आता तिपटीने मागणी वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याच्या यंत्रणेवरही ताण वाढला आहे.
औरंगाबादेत फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मार्चमध्ये सर्वाधिक रुग्णांची भर पडली. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १५ हजारांवर गेली. १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. औरंगाबादेत ७ मार्च रोजी रोज १५ टन ऑक्सिजन लागत होते. परंतु आता तिपटीने वाढला आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरची संख्या अपुरी पडत आहे. जम्बो सिलिंडरअभावी छोट्या सिलिंडरने ऑक्सिजन पुरविण्याची वेळ बुधवारी जिल्हा रुग्णालयात ओढावली होती. घाटीत बहुतांश इमारतीत ऑक्सिजन टँकद्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरविले जाते. याठिकाणी खबरदारी म्हणून एक ऑक्सिजन टँकर कायम उभा ठेवला जात असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.
ऑक्सिजनचा तुटवडा नाही
सध्या रोज ५४ टन ऑक्सिजन लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मागणीही वाढली आहे. परंतु कोणत्याही प्रकारे ऑक्सिजन तुटवडा नाही.
- संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन