- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : अजिंठा-वेरूळ लेण्या जगभरातील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. याठिकाणच्या बौद्ध लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी वर्षभरातून हजारो विदेशी पर्यटक येतात. बहुतांश पर्यटक अगोदर औरंगाबादला येऊन मगच अजिंठा- वेरूळकडे मार्गस्थ होतात; पण बौद्ध वारसा ठिकाणांपैकी एक असलेल्या शहरातील औरंगाबाद लेणीचा प्रचार आणि प्रसार होत नसल्याने आजही अनेक पर्यटक या लेण्यांबाबत अनभिज्ञ आहेत.
महाराष्ट्रातील बौद्ध वारसा ठिकाणे आणि तीर्थस्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटन खात्याच्या सहकार्याने शुक्रवार, २४ आॅगस्ट रोजी शहरात सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉनक्लेव्ह-२०१८ चे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेच्या माध्यमातून भारतातील बौद्ध वारसाच्या अंतरंगाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पर्यटन खाते आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे होत आहे.
बौद्ध स्थळांमधील क्षमता आणि संधी ओळखून घेण्यास मदत करणा-या या उपक्रमात अजिंठा येथील लेण्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. अजिंठा लेणीच्या तुलनेत आकाराने खूप लहान असली तरी औरंगाबाद लेणी बौद्ध वारसा ठिकाणांपैकी एक असून, या लेणीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे, शहराच्या पर्यटनाला आणखी चालना देणारे ठरेल, असे मत पर्यटनप्रेमींनी व्यक्त केले.
औरंगाबाद लेणीचा योग्य दृष्टीने प्रचार-प्रसार केल्यास अजिंठा- वेरूळ लेण्यांच्या अभ्यासासाठी येणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांकडेही आकर्षित होऊ शकतात. औरंगाबाद लेणी ही बीबीका मकब-यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असून, डोंगरात खोदलेली आहे. इसवी सनाच्या सहाव्या ते सातव्या शतकादरम्यान ही लेणी निर्माण करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. अजिंठा- वेरूळ लेण्यांचाही औरंगाबाद लेणीशी संबंध लावला जातो. अजिंठा- वेरूळ ही ठिकाणे आज जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित झाली असून, औरंगाबाद लेणी मात्र अजूनही पर्यटकांच्या प्रतीक्षेतच आहे.
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात येऊन गेलेले पर्यटकपर्यटनस्थळ भारतीय पर्यटक विदेशी पर्यटकऔरंगाबाद लेणी ९७, ७०७ १,५६५दौलताबाद किल्ला ५,६७,१९ १ ५,५०६बीबीका मकबरा १४,४७,५३५ १३, २३४वेरूळ लेणी १३,३४,१८७ २६, ६८९अजिंठा लेणी ३,९५,४५६ २२,१८३पर्यटकांत मोठी तफावतपुरातत्व विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून औरंगाबाद लेणीला भेट देणा-या पर्यटकांची संख्या सगळ्यात कमी असल्याचे दिसून येते. औरंगाबाद लेण्यांपासून बीबीका मकबरा अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असूनही मकब-यात येणारे पर्यटक आणि औरंगाबाद लेण्यांकडे जाणारे पर्यटक यात मोठी तफावत आहे. औरंगाबाद लेणीला भेट देणा-या भारतीय पर्यटकांमध्येही सुटीच्या दिवशी विरंगुळा म्हणून लेणी परिसरात फिरायला येणारे किंवा विद्यापीठातील विद्यार्थी यांचेच प्रमाण बहुतांश आहे.