औरंगाबाद : मुंबई - नागपूर हायस्पीड रेल्वेने (एमएनएचएसआर) औरंगाबादहून ( Mumbai-Nagpur High Speed Railway ) केवळ पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया, पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासह डीपीआरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले असून, अद्याप अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.
जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा १११ किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार असून, समृद्धी महामार्गालगत समांतर त्या रेल्वे ट्रॅकची बांधणी केली जाणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून, कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असल्याने लवकरच डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) काम हाती घेण्यात येणार आहे. डीपीआरनंतर प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, एकूण रहदारी याबाबी स्पष्ट होतील.
१४ ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि फायद्याचे दावेअजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजालाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रूक, शहापूर, ठाणे या १४ ठिकाणी एचएसआर स्टेशन बांधणे प्रस्तावित आहे. मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात जाता येणार, टाऊनशिप वाढीसह रोजगारनिर्मिती होईल. शहरी रस्ते दुरुस्तीचा खर्च कमी, हवेची गुणवत्ता सुधारेल, शहरातील अंतर्गत वाहतुकीचे प्रमाण कमी होईल. विद्यमान दळणवळण सुविधा सुटसुटीत होतील. असा दावा आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील किती जमीन जाणार३ तालुक्यांतील ४९ गावांलगत १११ कि.मी. अंतरातून हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातून १६७.९६ हेक्टर जमीन लागेल. त्यात ७३.७३ हेक्टर जमीन खासगी, तर ९४.२२ हेक्टर जमीन सरकारी असेल. सरकारी २०१, तर ४१० खासगी भूखंड संपादित करावे लागणार आहेत. औरंगाबाद तालुक्यातील २३ गावांतील ६१.९४ हेक्टर, गंगापूरमधील ११ गावांतील ३७.१०, तर वैजापूरमधील १५ गावांतील ६७.९० हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे.
हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नेमके काय असेल : एकूण लांबी - ७४९ किलोमीटरकिती स्थानक असणार - १४किती जिल्ह्यांना जोडणार- १०भूसंपादन किती जमिनीचे - १२४५.६१ हेक्टररेल्वेचा ताशी वेग किती - ३३० ते ३५० कि.मी.प्रवासी वाहतूक क्षमता - ७५०एकूण किती बोगदे असणार - १५ (२५.२३ कि.मी. लांबी)समृद्धी महामार्गालगत - १७.५ मीटर रुंदीचा मार्ग