शिवसेनेच प्रदीप जैस्वाल यांनी ८२२१७ मते घेत औरंगाबाद मध्य मतदारसंघात शानदार विजय संपादित केला. त्यांनी एमआयएमच्या नासेर सिद्दिकी ६८, ३२५ आणि वंचित बहुजन आघाडीच्या अमित भुईगळ २७३०२ यांच्या प्रभावाचा धक्का दिला.
२०१४ मध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ एमआयएमने शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांच्याकडूनच हिसकावून घेतला होता. यंदा विजयाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी एमआयएमने जोरदार कंबर कसली होती. तर एमआयएमच्या ताब्यात गेलेला आपला बालेकिल्ला परत घेण्यासाठी शिवसेना चुरशीने सरसावली होती.
अपेक्षेप्रमाणे सेना उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा थेट मुकाबला एमआयएमच्या नासेर सिद्दिकी यांच्याशी झाला. परंतु,राष्ट्रवादीचे कदीर मौलाना व वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांनीही जैस्वाल यांना कडवे आव्हान दिले. ते किती मत घेणार यावर त्यांच्या विजयाचे गणित होते. मात्र, सेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे मतविभाजनाचा मोठा धोका टळून जैस्वाल यांचा विजय मोकळा झाला, असा दावा युती कडून करण्यात आला होता. हा दावा जैस्वाल यांच्या दणदणीत विजयाने बरोबर ठरल्याचे आता दिसत आहे.