- रुचिका पालोदकर
साधारण १५-२० वर्षांपूर्वी बालनाट्य चळवळ शहरात जोमात सुरू होती. अनेक कलावंत या चळवळीने घडवले. मधल्या काळात ही चळवळ कुठेतरी मंदावल्यासारखी झाली. बोटांवर मोजण्याइतक्या काही नामवंत जुन्या नाट्यसंस्था नाट्य शिबिरे घ्यायच्या, बालनाट्यांचे आयोजन करायच्या, पण हे सगळे स्पर्धेपुरतेच खुंटलेले असायचे. आता मात्र यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असणारी बाल रंगभूमी परिषद औरंगाबादला सुरू झाल्यामुळे बालनाट्य चळवळीला पुन्हा धुमारे फुटणार, असा विश्वास रंगकर्मींकडून व्यक्त केला जात आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत मुळे याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, बाल रंगभूमी परिषदेतर्फे यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच मुलांसाठी शहरातील विविध भागांत आणि अत्यंत माफक दरात जवळपास ४ ते ५ नाट्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. नाटक या मुलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवायचे, हाच या शिबिरांचा उद्देश. या सर्वच शिबिरांकडे पालकांनी सकारात्मकतेने पाहिले आणि त्यामुळे शिबिरांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांना मिळालेला प्रतिसाद पाहता शहरातील बाल रंगभूमीला आलेली मरगळ लवकरच दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत, तसेच शहरातील रंगभूमीविषयीची आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे यावर्षी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत औरंगाबाद विभागातील नाटके संख्येने कमी असली तरी अत्यंत दर्जेदार होती. प्रशिक्षण शिबिरातून आणि नाट्य स्पर्धेतून नवनवीन लोक तयार होणे, ही नक्कीच आशादायक बाब आहे.
दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने धनंजय सरदेशपांडे, शरद कुलकर्णी, गंगाधर भांगे यांच्यासारखे शहरातील अनेक ज्येष्ठ रंगकर्मी एकत्र आले आणि त्यांनी या शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. रंगभूषाकार रवी कुलकर्णी हे बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षस्थानी असून, भांगे, अभय कुलकर्णी, आसिफ अन्सारी, सुनील सुतवणे, रमाकांत मुळे, शरद कुलकर्णी, सतीश बोरा यांचा परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये समावेश आहे. काही रंगकर्मी एकत्र येऊन डिसेंबर २०१९ मध्ये औरंगाबाद पातळीवर बालनाट्य महोत्सव आयोजित करणार आहेत. औरंगाबाद शहरातील जुन्या नाट्यसंस्था या महोत्सवात एकवटलेल्या दिसतील. हा महोत्सव तीन दिवसांचा होणार असून, दररोज व्यावसायिक दर्जाची चार बाल नाटके सादर होतील. यातूनही बालनाट्य चळवळ पुन्हा नव्या जोमाने फुलून येईल आणि येथून पुन्हा नवे कलावंत घडतील, असे आशादायक वातावरण निर्माण होत आहे.