औरंगाबाद : चेलीपुरा भागात नशेच्या गोळ्या विकण्यासाठी दोघेजण येत असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली. त्यानुसार लावलेल्या सापळ्यात दोघे अलगदपणे अडकले. या दोघांकडून ८० हजार ८०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
शोएब खान अन्वर खान (२१, रा.फाजलपुरा), सय्यद सद्दाम सय्यद जकी (२४, रा. हर्सूल) या दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. निरीक्षक गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे गुंगीकारक व नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांची अवैध विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती उपनिरीक्षक शाकेर शेख यांना मिळाली होती. याविषयी खात्री केल्यानंतर औषध निरीक्षक ब. द. मरेवाड यांना बोलावून घेत सिटी चौक पोलिसांनी सापळा लावला. या सापळ्यात दोन जणांना पकडण्यात आले.
या दोघांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या नशेच्या गोळ्या आढळल्या. एकूण ८० हजार ८०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात हवालदार मुनीर पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. ही कारवाई निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक शाकेर शेख, हवालदार मुनीर पठाण, सय्यद शकील, शाहीद शेख, सोहेल पठाण, अभिजित गायकवाड, प्रवीण टेकले यांच्या पथकाने केली. अधिक तपास सहायक निरीक्षक सुनील कराळे करत आहेत.
आरोपींना पोलिस कोठडी
आरोपी शोएब खान, सय्यद सद्दाम या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केल्याची माहिती निरीक्षक गिरी यांनी दिली.