लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा ऐतिहासिक अनुभव शहरवासीयांनी घेतला. बस जाळण्याची किरकोळ घटना वगळता संपूर्ण शहरावासीयांनी शांततेत अभूतपूर्व बंद पाळला. शहर प्रथमच १० तास कडकडीत बंद होते. जालना रोडसारखा वर्दळीचा रस्ताही पहिल्यांदाच बंद राहिल्याचे पाहावयास मिळाले. टीव्ही सेंटर ते देवळाई चौक, नगर नाका ते चिकलठाणा आणि ज्युबिलीपार्क ते मयूरपार्कपर्यंत सर्व व्यवहार ठप्प होते. शहरातील मराठा समाजबांधव मुलाबाळांसह रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करीत होते. आंदोलकांनी विविध रस्त्यांवर दगड, लाकडी ओंडके आणि जलवाहिनीचे लोखंडी पाईप टाकून रस्ता बंद केला, तर काही ठिकाणी पोलिसांच्या बॅरिकेड्सचा वापर आंदोलकांनी रस्ता अडविण्यासाठी केला. आंदोलनामुळे तीन रेल्वेगाड्या रोखल्या गेल्या. ‘जय भवानी, जय शिवराय’च्या जयघोषासोबत ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘फडणवीस सरकार मुर्दाबाद’, यासह अनेक घोषणा प्रत्येक चौकात ऐकायला मिळत होत्या.महावीर चौक येथून शहरात प्रवेश घेण्यासाठी जालना रोडवरून यावे लागते. डाव्या बाजूला रेल्वेस्टेशन तर उजव्या बाजूला मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा मार्ग आहे. बंदमुळे एस.टी. रस्त्यावर नव्हत्या, तर रेल्वेस्थानकाकडून येणारी वाहतूकही बंद होती. पुढे क्रांतीनगर, अदालत रोड सिग्नल, समर्थनगरकडे जाणाऱ्या मार्गावर शुकशुकाट होता. क्रांतीचौक तर मराठा क्रांती मोर्चाने दुमदुमून गेला होता. त्यामुळे समर्थनगरपासून त्या चौकाकडे पोलिसांनी जाऊ दिले नाही. क्रांतीचौकातून पैठणगेटकडे जाणारा आणि बन्सीलालनगरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. दुचाकींशिवाय कुठलेही वाहन त्या रस्त्यावरून क्रांतीचौकाकडे येत नव्हते.अमरप्रीत चौक बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आला होता. तेथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी ठिय्या दिला होता. अजबनगरमार्गे वाहतूक सुरू होती. मोंढानाका येथून जाफरगेट आणि शिवशंकर कॉलनी, बालाजीनगरकडे जाणारी दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. आकाशवाणी चौकात आंदोलकांनी ठिय्या देत रस्ता बंद केला होता. जवाहर कॉलनी व कैलासनगरकडे जाणारी वाहतूक यामुळे बंद होती. सेव्हन हिल येथे पोलिसांनी बॅरिकेटस् लावले होते. येथून तर दुचाकी वाहनांना देखील आंदोलकांनी जाऊ दिले नाही. एमजीएममार्गे सेंट्रल नाका ते गजानन मंदिर ते सूतगिरणीपर्यंत रस्ता बंद होता. वसंतराव नाईक चौक येथही रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे जयभवानीनगर आणि सिडको-हडकोकडे जाणारी वाहतूक बंद होती. मुकुंदवाडी येथे छत्रपती शिवाजी चौकात रस्ता बंद करण्यात आला होता. चिकलठाणा येथेही मराठा क्रांती मोर्चाने ठिय्या केले.दुचाकींविना वाहन दिसलेच नाहीशहरातील रस्त्यांवर दुचाकींशिवाय दुसरे वाहन दिवभर दिसले नाही. चारचाकी वाहनांनादेखील अंतर्गत गल्ल्यांतून मार्ग शोधत जावे लागले. ज्यांना अंतर्गत रस्ते माहिती नव्हते, त्यांनी जालना रोडवरून राँगसाईड वाहने चालविली. ११५ वॉर्डांना एकमेकांशी जोडणाºया बहुतांश रस्त्यांवर आंदोलकांची गर्दी होती. एक मराठा, लाख मराठा या घोषणेने शहरातील प्रत्येक चौक दुमदुमून गेला होता.
अंबादास दानवेंनी आंदोलकाला लाथाडलेऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य आंदोलनस्थळ असलेल्या क्रांतीचौकात जमलेले युवक सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देत होते. त्याठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही घोषणा सुरू होत्या. त्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आक्षेप घेत एका युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संतापलेल्या युवकांनी दानवे यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दानवे यांना घटनास्थळावरून बाहेर काढले.क्रांतीचौकात शहरातील सर्व भागातील युवक जमा झालेले होते. आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. याचवेळी दानवे हे क्रांतीचौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन घोषणा देण्यास त्यांनी आक्षेप घेतला. यावरच न थांबता घोषणाबाजी करणाºया युवकाच्या तोंडात मारत लाथाबुक्क्यांनी तुडवले. दुसºया एका युवकाला दरडावत असताना एकच गोंधळ सुरू झाला. पाठीमागून दानवे यांना धक्काबुक्की झाली. अनुचित घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी दानवे यांना सुरक्षिततेत बाहेर काढले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या घडलेल्या प्रकाराबद्दल युवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन केले जात आहे. यात कोणत्याही एका पक्षाला किंवा नेत्याला टार्गेट केले जात नाही. तेव्हा आंदोलनस्थळी यायचे असेल, तर पक्ष बाजूला ठेवून यावे, अन्यथा येऊ नये असेही युवकांनी सुनावले. तसेच आंदोलनस्थळी गोंधळ घालण्याची ही अंबादास दानवे यांची तिसरी वेळ आहे. आगामी काळात त्यांनी पक्ष बाजूला ठेवून सहभागी व्हावे अन्यथा धडा शिकविण्यात येईल, असेही युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, घडलेल्या प्रकारामुळे संतप्त युवकांनी सायंकाळी दानवे यांच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी जाणार होते. मात्र पोलिसांनी युवकांना अडवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.