औरंगाबाद : मराठवाड्यातील तरुण सिमी, इसिस आणि सनातनसारख्या कट्टर धर्मवादी संघटनांच्या विळख्यात अडकू लागले आहेत. धर्मकट्टरतेची बीजं तरुणांच्या डोक्यात पेरण्याच्या दहशती उपक्रमात तरुणांचा वाढता सहभाग असल्याचे मागील काही वर्षांतील घटनांमुळे स्पष्ट होत आहे.
सिमी (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया) या संघटनेची पाळेमुळे मराठवाड्यात असल्याचे अनेकदा सिद्ध झाले. सिमी या संघटनेवर बंदी आणल्यानंतर इसिसच्या (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया) हस्तकांचे मराठवाड्यात विशेषत: औरंगाबादपासून पूर्ण विभागात जाळे असल्याची मािहती पुढे आली आणि आता सनातन या संस्थेच्या सहा जणांना आजवर दहशतवादी विरोधी पथक, सीबीआयच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येशी निगडित तपास एटीएस आणि सीबीआय करीत आहे. पुणे, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यापर्यंत त्या हत्येचे कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.
सिमीचे नेटवर्क पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, जालना ते नांदेड असे होते. इसिसचे नेटवर्कदेखील याच दिशेने असल्याचे २०१६ मध्ये समोर आले. मराठवाड्यातील १०० तरुण इसिसचे हस्तक असल्याची तक्रारही मध्यंतरी पोलिसांकडे लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानंतर आता सनातनचे नेटवर्कदेखील पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड असेच असल्याची शक्यता तपासयंत्रणा वर्तवित आहे. विभागातील काही घटना२००२ मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद स्फोटाप्रकरणी ११ जणांना ताब्यात घेतले होते. २००३ मध्ये परभणीतील स्फोटात हिंदुत्वादी संघटनांशी निगडित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
२००६ मध्ये औरंगाबाद ते नाशिक हायवेवर १७ जणांकडून एटीएसने ४३ किलो आरडीएक्स, १६ एके-४७, ५० हॅण्ड ग्रेनेड हस्तगत केले होते. २०१० मध्ये पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटानंतर इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा, सिमी, इसिस या संघटनेच्या हस्तकांचा शोध घेत एटीएसने मराठवाड्यातही कारवाई केल्या. २०१२ मध्ये हिमायतबागमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक एनकाऊंटरमध्ये मारला गेला.
सनातनशी निगडित सहा जण ताब्यातसनातन या संस्थेशी निगडित सहा जणांना आजवर सीबीआय आणि एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शरद कळसकर, सचिन अंदुरे, श्रीकांत पांगरकर, रोहित रेगे, अजिंक्य सुरळे, शुभम सुरळे यांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे रेगे आणि सुरळे अशा तिघांना ताब्यात घेतल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात एटीएसने केली आहे.
पोलीस यंत्रणा कमी पडत असावीअलीकडच्या काळात मराठवाड्यात सिमी, इसिस, सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांचे नेटवर्क फोफावत चालले आहे. एटीएस आणि सीबीआयला येऊन येथे कारवाई करावी लागते आहे. याबाबत सेवानिवृत्त सनदी पोलीस अधिकारी सुधाकर सुरडकर यांच्याशी संपर्क करून नेमक्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सुरडकर म्हणाले, वेगवेगळ्या संघटनांचे नेटवर्क फोफावत आहे, याचा अर्थ पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे स्पष्टच आहे. पोलिसांचे काम नियंत्रण मिळविणे आहे. नियंत्रण मिळविण्यासाठी माहिती लागते. माहिती मिळण्यासाठी लोकांचा पोलिसांवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. पोलिसांना माहिती मिळत नाही, याचा अर्थ लोकांचा यंत्रणेवर विश्वास नाही. लोकांचा विश्वास मिळवावा लागेल. जेणेकरून दहशतवादी संघटनांच्या कारवायांची खडान्खडा माहिती पोलिसांना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.