- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : डिजिटलायजेशनच्या सुविधेमुळे शहर अधिक सुरक्षित झाले असून, आता अवघ्या पाच मिनिटांत शहरातील कोणत्याही भागात पोलिसांची मदत पोहोचणे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिसांची कार्यक्षमता व कामगिरीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. फूड, टॅक्सीसेवा अशा काही खाजगी सेवा जीपीआरएस लोकेशन या सेवेच्या माध्यमातून शहरात कार्यरत आहेत. याच सेवेचा धागा पकडत स्मार्ट सिटीत गुन्हेगारीवर लक्ष ठेवून शहरातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिले जात आहे.
शांततेत पार पडलेले विविध उत्सव, निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या वेळी पोलिसांची सतर्कता दिसून आली. संरक्षणाच्या बाबतीत गाफील राहता कामा नये, रस्त्यावरील सोनसाखळी, चोऱ्यामाऱ्या तसेच रस्त्यावरील गुन्ह्यांची पोलीस कंट्रोल रूमला माहिती मिळाली की, प्रामुख्याने तांत्रिक विभागाच्या माध्यमातून ठराविक स्थळापासून कोणते वाहन किती अंतरावर आहे. घटनास्थळी कोण तात्काळ जाईल, याचे मॅप लोकेशन घेऊन तात्काळ त्या वाहनाला घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. दिवसभरातून येणाऱ्या कॉलवर कंट्रोल विभाग आता आधुनिकीकरणातून लक्ष ठेवण्याचे काम करीत आहे. ठाण्याच्या हद्दीत लक्ष शहरात १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वन मोबाईल, टू मोबाईल वाहन आदी ३४ गाड्या, तसेच मोटारसायकली ३७ आणि इतर गस्तीच्या १० गाड्या सतत रस्त्यावर गस्तीवर असतात. शहरातील कोणत्याही कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनेत तात्काळ मदत देण्यासाठी यंत्रणा कार्यरत झालेली आहे. त्यावर आयुक्तालयातील कंट्रोल विभागातून विशेष लक्ष ठेवून आहेत. कोणते वाहन कुठे थांबले की, गस्तीवर याचा अंदाज पोलीस यंत्रणेला क्षणात घेणे शक्य झाले आहे.
डिजिटलायजेशनचा फायदावाहनाला नवीन ३० कॅमेरे लावण्यासाठी मंजुरी दिली आहे. जीपीआरएसच्या माध्यमातूनही एका क्लिकवर रस्ते व विविध स्पॉटवर खाजगी २,७०० च्या जवळपास कॅमेऱ्यांची मदत मिळत आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या सूचनेनुसार घटनास्थळावर गस्ती वाहन पोलिसांसह अवघ्या पाच मिनिटांत पाठवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे गुन्हेगारांना चपराक बसण्यासाठी मोठी मदत झाली आहे. शहरातून फिरणाऱ्या गस्ती पथकांवरदेखील जीपीआरएसच्या माध्यमातून लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. क्राईमच्या घटना रोखण्यास मदत होत आहे. -डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)