औरंगाबाद: मालमत्ता कर कमी करण्यासाठी घरमालकाकडून लाचेच्या स्वरुपात साडेतीन हजार रुपये आणि व्हिस्कीचा खंबा घेताना महापालिकेच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई ३१ मार्च रोजी सिडको परिसरात करण्यात आली. प्रभू लक्ष्मण चव्हाण (५२, रा. सुलतानपूर, ता. खुलताबाद) असे अटकेतील कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिडको एन-६ मधील रहिवासी विठ्ठल गजानन दाभाडे यांचे संभाजी कॉलनीत घर आहे. त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ब कडून मालमत्ता कराची नोटीस प्राप्त झाली होती. हा कर कमी करावा, याकरिता त्यांनी कनिष्ठ लिपिक प्रभू चव्हाण याची भेट घेतली. तेव्हा त्याने कर कमी करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी दाभाडे यांच्याकडे केली. दाभाडे यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चव्हाणची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष ३० मार्च रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली तेव्हा आरोपीने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. यापैकी नगदी दीड हजार रुपये घेतले. उर्वरित साडेतीन हजार रुपये आणि दारूचा एक खंबा ३१ मार्च रोजी आणून देण्याचे सांगितले. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दिलीप साबळे, अंमलदार भीमराज जिवडे, दिगंबर पाठक, साईनाथ तोडकर, चांगदेव बागूल यांनी गुरुवारी सायंकाळी सिडको वॉर्ड कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून दारूचा खंबा आणि साडेतीन हजार रुपये रोख घेताच पोलिसांनी चव्हाणला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.