औरंगाबाद - पाणीप्रश्नाला मी सामोर जातोय, कुठेही फसवेगिरी नाही. मी प्रामाणिक आहे. पूर्वी दहा दिवसांपूर्वी पाणी यायचं आता हे दिवस कमी कमी होत चालले आहेत. सभेला येताना प्रशासकीय अधिकारी भेटले. झारीतले शुक्राचार्य त्यांना बाहेर फेका आणि माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या असं अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. पाणी योजनेसाठी मी पैसे देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने देणार आहे. योजनेसाठी पैसे कमी पडून देणार नाही. परंतु योजनेला विलंब झाला तर दया, माया न दाखवता कंत्राटदाराला तुरुंगात टाका असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं आहे. पूर्वीप्रमाणे आजही मैदानाचा कोपरा भरलेला आहे. तोच जल्लोष, उत्साह आहे. जागा नाहीत, मैदान पुरत नाही इतकी आपली ताकद वाढत चालली आहे. तुमच्या रुपाने आई तुळजाभवानीचं दर्शन घेतोय. देवसुद्धा आपली सभा कशी बघत असेल असं दृश्य मी पाहिले. ढेकणं चिरडण्यासाठी तोफेची गरज लागत नाही. त्यासाठी आपली शक्ती वाया घालवायची नाही. हिंदुत्व हा आपला श्वास आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हे तर सत्ता गेल्यामुळे शहरात आक्रोश काढण्यात आला. तुमची सत्ता असताना पाणी योजनेला का निधी दिला नाही. खोटे बोलणं हे आमच्या हिंदुत्वात नाही. रस्त्यासाठी निधी दिला आहे. ३-४ वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते आणि आज पाहा. रस्ते सुधारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाले. पर्यटनासाठी जंगलसफारी होतेय. मेट्रोसाठी प्लॅन बनवण्याची सुरुवात झाली आहे. विद्रुपीकरण करणारी मेट्रो नसेल. विध्वंसक विकासकामे आमच्याकडून होणार नाही. शहराची शान वाढवणारी विकासकामे होतील हे वचन मी तुम्हाला देतो असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
संभाजीनगर कधी करणार?संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिला.