औरंगाबाद: 21 मे रोजी शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात एकतर्फी प्रेमातून सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी (18, रा. उस्मानुपरा) हिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. आरोपी शरणसिंग सेठी (20, रा. भीमपुरा, उस्मानपुरा) हा तरुणीचा खून करुन फरार झाला होता. त्याला आज नाशिकच्या लासलगावमधून ताब्यात घेतले. दरम्यान, मृत तरुणीसाठी औरंगाबाद शहरात कँडल मार्च काढण्यात आला.
आरोपीला कठोर शिक्षेची मागणीसुखप्रीत कौरच्या हत्येनंतर शहरात एकच खळबळ उडाली. दिवसा ढवळ्या अनेकांसमोर झालेल्या या घटनेन नागरिक सुन्न झाले आहेत. आज मृत सुखप्रीतसाठी शहरात कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यात सुखप्रीतच्या कुटुंबीयांसोबतच मोठ्या संख्येने शहरातील तरुण-तरुणी सहभागी झाले. यावेळी अनेकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
काल नेमकं काय झालं?काल देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या सुखप्रीत हिचा निर्घृण खून झाला. दुपारी ती महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या कॅफेतून बाहेर अली असता, तिची आरोपी शरणसिंग सोबत शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर आरोपीने तरुणीला कॉलेजपासून 200 फुट ओढत नेले आणि तिच्या मानेवर-पोटावर धारदार हत्याराने 18 वार केले. यानंतर शरणसिंग तेथून दुचाकीवर पळून गेला होता.
लासलगावातून आरोपी अटकेतसुखप्रीतच्या मैत्रिणीने या घटनेची माहिती तिच्या भावाला दिली. यानंतर सुखप्रीतचे दोन्ही भाऊ घटनास्थळी आले. त्यांनी तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. यानंतर शरणसिंगच्या विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी एका ट्रमधून नाशिकला पळून गेला होता. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर औरंगाबाद आणि नाशिक पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले.