औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या फॉर्म्युल्याचे तंत्रज्ञान तुर्कस्तानी कंपनीला विक्री करणाऱ्या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यास गुन्हे शाखा पोलिसांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. कंपनीचा राजीनामा देऊन आरोपी कंपनीच्या फॉर्म्युल्याची हार्डडिस्क घेऊन २०१२ पासून विदेशात गेला होता.
दिलीप नाना लोके (६५, रा. सिडको एन-५), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीचे अन्य साथीदार सुरेश हरिभाऊ कुलकर्णी आणि विलास किसनराव शिंदे हे पसार असून, तेसुद्धा विदेशात आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, आरोपी लोके हे वाळूज एमआयडीसीमधील एका नामांकित कं पनीत उच्चपदावर कार्यरत होते. कंपनीचे तंत्रज्ञान सांभाळण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. २०१२ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते तुर्कस्तानमध्ये गेले. तत्पूर्वी, त्यांनी कंपनीच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान, फॉर्म्युला चोरून नेला होता. हे तंत्रज्ञान त्यांनी विदेशातील एका कंपनीला दिले आणि त्याआधारे विदेशी कंपनीने उत्पादन करण्यास सुरुवात केली.
आपल्यासारखेच हुबेहूब उत्पादन विदेशी कंपनीने बाजारात आणल्याचे औरंगाबादेतील कंपनी मालकास समजले. त्यांनी अधिक चौकशी केली असता, कंपनीचा राजीनामा दिलेले आरोपी दिलीप लोके, सुरेश कुलकर्णी आणि विलास शिंदे हे त्या तुर्कस्थानी कंपनीशी निगडित असल्याचे समोर आले. त्यांनीच कंपनीचे तंत्रज्ञान चोरून नेले आणि विदेशातील कंपनीला विक्री केल्याचे त्यांना समजले. कंपनीने आरोपींविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात १२ डिसेंबर २०१७ रोजी तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेतला तेव्हा तिन्ही आरोपी विदेशात असल्याचे त्यांना समजले.
पोलिसांनी विमानतळावरील इमिग्रेशन विभागासोबत पत्रव्यवहार करून संबंधित आरोपी विदेशातून भारतात येताच त्यांना ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे, असे सांगितले होते. आरोपी लोके हा १९ मे रोजी तुर्कस्थानातून विमानाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. विमानळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले आणि याबाबतची माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्तांना कळविली. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी मुंबईत जाऊन त्यास अटक करून आणले.
आरोपीला २३ पर्यंत पोलीस कोठडीआरोपी लोके यास अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोेर हजर केले. त्याने चोरलेले तंत्रज्ञान आणखी किती लोकांना विक्री केले. त्याच्या अन्य साथीदारांना अटक करायची असल्याने पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने त्यास २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.