औरंगाबाद : रस्त्यावर वाहन उभे करून, अथवा हातगाडी लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात वाहतूक शाखेतर्फे आता थेट गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. २४ तासांमध्ये पोलिसांनी तब्बल २३ जणांविरोधात वाहतुकीला अडथळा आणल्यामुळे विविध ठाण्यांत गुन्हे नोंदविले, अशा प्रकारचे गुन्हे नोंद होत असल्याने रस्त्यांवरील हॉकर्स आणि वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीत गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा समोर आला. वाहतुकीला अडसर ठरतील अशा प्रकारे रस्त्यावर, चौकालगत वाहने उभी करणाऱ्यांविरोधात आणि हॉकर्सवर थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. आयुक्तांकडून आदेश मिळताच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कारवाई सुरू झाली.
सिडको पोलिसांनी चिश्तिया चौक रस्त्यावर फळविक्रीचे दुकान थाटल्याप्रकरणी पाशा नूरखाँ पटेल, शेख सईद शेख मजीद, नदीम बागवान अय्युब वजीर, शेख फारुख महंमद नासेर आणि मोहंमद शेख नईम यांच्याविरोधात वेगवेगळे गुन्हे नोंदविले. पुंडलिकनगर पोलिसांनी रिक्षाचालक शुभम सुंदरलाल जैस्वाल, संतोष नागोराव बोंगाणे, नितीन शरद घोरपडे यांच्याविरोधात जयभवानीनगर चौकात कारवाई केली. उस्मानपुरा पोलिसांनी रिक्षाचालक देवीदास केशव गायकवाड, अब्दुल रहिम खान रसूल खान, सिद्धार्थ नारायण भुईगळ, बाबासाहेब कैलास म्हस्के आणि अमोल गजानन मोरे यांच्याविरोधात गुन्हे नोंदविले.
जिन्सी पोलिसांनी जीपचालक मोहंमद कबीर शगीर अहेमद, रिक्षाचालक सय्यद मोईन सय्यद मेहताब, मालवाहू रिक्षाचालक अमीरोद्दीन इस्लामोद्दीन अन्सारी, अयुब खान छिद्दू खान, कासमी रिसोद्दीन अन्सारी यांच्याविरोधात रहेमानिया कॉलनी येथे कारवाई करीत गुन्हे दाखल केले. हर्सूल पोलिसांनी हर्सूल टी पॉइंट येथे रस्त्यावर जीप उभी करणाºया मोहम्मद शकील मोहम्मद जमील याच्याविरोधात गुन्हा नोंदविला, तर जवाहरनगर पोलिसांनी गारखेडा चौकात टँकरचालक शेख अफजल शेख खाजा आणि रिक्षाचालक संदीप जयप्रकाश जैस्वालविरोधात गुन्ह्याची नोंद केली. सातारा पोलिसांनी अजिम खान अजित खान आणि वाजीद खान युनूस खान या फळविक्रेत्याविरोधात कारवाई केली.
यापुढेही कारवाईयाविषयी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्यावर वाहने आणि हातगाड्या लावून वाहतुकीला अडथळे निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा परिणाम होत नाही. म्हणून आता थेट गुन्हे नोंदवून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जात आहे. ही कारवाई यापुढे सुरू राहणार आहे.