औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२ रुपये ५६ पैशांनी डिझेल महागले आहे. दरवाढीचा फटका एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानक आगाराला बसत असून, महिन्याला ७० लाख रुपयांचा आर्थिक बोजा आगारावर पडत आहे. इतर सातही आगारांची कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती असल्याचे दिसून येते.
गत काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वधारल्या आहेत. याचा परिणाम महागाई वाढण्यात होत असल्याचे दिसते. जिल्ह्यातील सर्वात मोठे औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आगार असून, शिवनेरी ८, शिवशाही २५, निमआराम ३८, परिवर्तन ८७ बसेस आहेत. या आगारातून मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, इंदूर, सुरत आदी मार्गांवर बसेस सोडल्या जातात. प्रवासी आणि बसेसची संख्या पाहता दररोज १५ हजार लिटर डिझेलची गरज आगाराला भासते. गतवर्षी या महिन्यात डिझेलचे दर प्रति लिटर ५९ रुपये ५९ पैसे होते. ते सध्या १२ रुपये ५६ पैशांनी वधारले आहेत. सध्या महामंडळाला ७२ रुपये १५ पैसे प्रति लिटर दराने डिझेलचा पुरवठा केला जात आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे मध्यवर्ती बसस्थानक आगाराला डिझेलपोटी दररोज १ लाख ८८ हजार ४०० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. दर महिन्याला जवळपास ७० लाख रुपयांचा फटका डिझेल दरवाढीमुळे मध्यवर्ती बसस्थानक आगाराला सहन करावा लागत आहे.
दररोज १५ हजार लिटर डिझेलचा वापरजिल्ह्यातील सर्वात मोठे आगार मध्यवर्ती बसस्थानकाचे असून, प्रवाशांची संख्याही मोठी असते. बसेसचा विचार केल्यास दररोज १५ हजार लिटर डिझेल लागते. दर वाढल्याने महिन्याला ७० लाख रुपयांचा फटका बसत आहे. - अमोल भुसारी, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक, औरंगाबाद