औरंगाबाद : भारतात जी-२० हे शिखर संमेलन २०२३ मध्ये पहिल्यांदाच होणार आहे. या शिखर संमेलनासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी औरंगाबादेतील वेरूळ, अजिंठा लेण्यांचा विचार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी संमेलन संयोजक सहसचिव एल. रमेशबाबू व पथकाने अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्यासह लेण्यांची पाहणी केली.
मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साैदी अरेबियात १५ वे शिखर संमेलन झाले. त्यानंतर २०२१ मध्ये इटलीत, २०२२ मध्ये इंडोनेशियामध्ये आणि २०२३ मध्ये भारताला यजमानपदाची संधी मिळाली आहे. दिल्लीत संमेलन होणार असून देशातील ४० ते ५० शहरांत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी पर्यटन व इतर माहितीच्या अनुषंगाने जाणार आहेत. त्यासाठी संयोजकांनी पाहणी सुरू केली आहे. एनजीओ, दूतावास, अधिकारी यांच्यापैकी एका गटाला औरंगाबादमध्ये आणण्यासाठी संमेलन संयोजकांनी पाहणी केली. येथील हॉटेल्स, काही संस्थांचे सभागृह, दळणवळण सुविधांचा आढावा संयोजकांनी घेतला. अप्पर जिल्हाधिकारी गव्हाणे यांच्यासह पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
हे देश आहेत जी-२० मध्येजी- २० मध्ये में अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, साऊदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, इंग्लंड, अमेरिका व युरोपीय संघ जी-२० मध्ये आहेत. यातील कोणत्याही देशातील सुमारे २०० ते २५० उच्चस्थ अधिकाऱ्यांचे पथक परिषदेच्या दरम्यान औरंगाबादेत पर्यटन, संस्कृती, उद्योग, अर्थकारण समजून घेण्यासाठी येऊ शकते. पथक आल्यास किमान ३ दिवस औरंगाबादमध्ये थांबेल.
औरंगाबादला मान मिळाला तर काय...?जी-२० शिखर संमेलनातील एखाद्या राष्ट्रातील पथकाचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबादला मिळाल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. येथील पर्यटनस्थळे दाखविण्यासह येथील उद्योगांची भरारी, गुंतवणुकीचे पर्याय त्यांच्या समोर ठेवण्यात येतील. भविष्यात पर्यटन, उद्योगवाढीसाठी फायदा यातून होईल. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांच्या स्पर्धेत येथील पर्यटनस्थळांमुळे औरंगाबादची निवड होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली.