लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक घटनेच्या अनुषंगाने गोपनीय शाखेकडून प्राप्त होणाऱ्या अहवालात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिलेला असतो. शहागंजमधील घटनेनंतर आलेल्या एका अहवालाची गंभीर दखल न घेता, ‘लांडगा आला रे लांडगा आला’, या म्हणीप्रमाणे पोलिसांनी त्याकडे पाहिले. परिणामी ११ आणि १२ मे रोजी अचानक उद्भवलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी बेसावध पोलिसांना तब्बल आठ तास लागले.शहागंज येथे झालेल्या भांडणानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा गोपनीय शाखेने दिलेला अहवाल, एप्रिल महिन्यात पोलिसांना प्राप्त झाला, मात्र असे अहवाल गोपनीय शाखेकडून नेहमीच येतात, असे समजून पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने दंगलखोरांचे फावले. ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेली दंगल पूर्वनियोजित नव्हती, मात्र दंगलीची तयारी झाल्याचे हळूहळू स्पष्ट झाल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकारांना दिली.११ आणि १२ मे रोजी शहरात दंगल झाली. या दंगलीत पोलिसांच्या गोळीबारात एका मुलाचा आणि दंगेखोरांनी पेटविलेल्या घरात एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. दंगलीत दहा कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. तर व्यापारी समुहाला मोठा आर्थिक फटका बसला.दंगलीत पोलीस शिवसेनेसोबत होते आणि ते कार्यकर्त्यांसारखे वागले, असा आरोप काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून झाला. याविषयी पोलीस आयुक्तांना विचारले असता, राजकीय नेत्यांच्या आरोपांविषयी मी काहीच बोलणार नाही. मात्र पोलिसांनी डोळ्यात तेल घालून दंगल आटोक्यात आणली. दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या दंगलीत पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले.दंगल पूर्वनियोजित होती का, या प्रश्नाचे उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, मोतीकारंजा, शहागंज येथील किरकोळ भांडणे पोलीस ठाण्यापर्यंत आली. दोन्ही गटांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला. त्यांच्यात तडजोड झाल्याची नोंद पोलीस ठाण्याच्या डायरीत घेण्यात आली. अशा नोंदी विविध पोलीस ठाण्यात नियमित ठाणेदार घेतात. दोन समुदायांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे होत होती, मात्र या भांडणांचे रुपांतर दंगलीत होईल, असे पोलिसांना कधीच वाटले नाही आणि त्याबाबतचा अहवाल गुप्तवार्ता विभाग अथवा विशेष शाखेकडून पोलिसांना प्राप्त झाला नव्हता. असे असले तरी दंगलीची तयारी अत्यंत गुप्तपणे सुरू होती. याबाबतची माहिती मात्र मिळाली नाही.दंगलपूर्वी काहींची तयारी होतीदंगल पूर्वनियोजित होती का, या प्रश्नाचे उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, गांधीनगर येथे एका गॅरेजमध्ये झालेले किरकोळ भांडण हे या दंगलीचे तत्कालिक कारण आहे. दंगल नियोजित नव्हती, मात्र दंगलीची तयारी सुरू होती, हे मात्र दंगलीनंतर पोलीस तपासात समोर आले आहे. तपास कामात किंवा दंगलीनंतरचे प्रकरण हाताळण्यात आपण कोणत्याही समुदायाच्या बाजूने किंवा विरुध्द कारवाई केली नसल्याचेही भारंबे यांनी यावेळी स्पष्ट केले.
औरंगाबाद शहरातील दंगल नियोजित नव्हती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:26 AM
शहरातील प्रत्येक घटनेच्या अनुषंगाने गोपनीय शाखेकडून प्राप्त होणाऱ्या अहवालात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिलेला असतो. शहागंजमधील घटनेनंतर आलेल्या एका अहवालाची गंभीर दखल न घेता, ‘लांडगा आला रे लांडगा आला’, या म्हणीप्रमाणे पोलिसांनी त्याकडे पाहिले. परिणामी ११ आणि १२ मे रोजी अचानक उद्भवलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी बेसावध पोलिसांना तब्बल आठ तास लागले.
ठळक मुद्देपोलीस आयुक्त : कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासंबंधी मिळाला होता अहवाल