- राजेश भिसे
औरंगाबाद : जिल्ह्यात माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांपैकी तब्बल ३३ हजार ४६३ वाहने ही फिजिकल अनफिट असल्याचे आरटीओतील सूत्रांनी सांगितले. ही वाहने रस्त्यावर उतरल्यास इतर निष्पाप लोकांचा बळी जाऊ शकतो. म्हणून जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या दोन भरारी पथकांकडून अशा वाहनांचा शोध घेतला जात असून, वाहनमालकांना नोटिसाही बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदीनुसार जिल्ह्यात १ लाख २३ हजार २४० माल व प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत. यामध्ये रिक्षा, टेम्पो, ट्रक, टँकर, लॉरी, तीन आणि चारचाकी डिलिव्हरी हॅन, मिनी बस, मोठी बस, डंपर, टुरिस्ट कॅब आदी वाहनांचा समावेश आहे. यापैकी ९३ हजार २४० वाहने सुस्थितीत म्हणजेच ‘लाईव्ह’ आहेत. उर्वरित ३३ हजार ४६३ वाहनांकडे फिजिकल फिटनेस प्रमाणपत्र नाही. काही महिन्यांपूर्वी व्यावसायिक वाहनांना फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घेण्याचे आवाहन आरटीओ कार्यालयातर्फे करण्यात आले होते. त्यानंतर १ लाख २३ हजार २४० वाहनांपैकी ९३ हजार २४० वाहनमालकांनी वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट घेतले. मात्र, उर्वरित वाहनचालकांनी आपली वाहने आरटीओ कार्यालयात आणलीच नाहीत. त्यामुळे ही वाहने स्क्रॅबमध्ये काढण्यात आली की रस्त्यावर धावत आहेत, याबाबत अधिकारी साशंक आहेत.
या वाहनांमुळे निरपराध लोकांचा बळी जाऊ नये, यासाठी दक्षतेचे उपाय म्हणून आरटीओ कार्यालयाकडून या वाहनांची शोधमोहीम राबवली जात आहे. सध्या जिल्ह्यात असलेल्या दोन पथकांकडून नियमित तपासणीदरम्यान या वाहनांचाही शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोहिमेत वाहने आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच वाहनाचे फिटनेस करून घेण्याचे आदेश दिले जातील. तरीही वाहनचालकांनी फिटनेस सर्टिफिकेट न घेताच वाहने रस्त्यावर आणली, तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचाही पर्याय असेल, असे सूत्रांनी सांगितले.
कालमर्यादेनंतर फिटनेस घेता येऊ शकतेवाहननिर्मितीच्या साधारणपणे पंधरा वर्षांचा कार्यकाळ फिटनेससाठी गृहित धरण्यात येतो. त्यानंतर मालकांनी वाहन फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घेतल्यास त्यांना त्याचे नूतनीकरण करून दिले जाते, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिली. १ लाख २३ हजार २४० वाहनांपैकी ३३ हजार ४६३ वाहनांकडे फिटनेस सर्टिफिकेट नाही. अशी वाहने रस्त्यावर उतरल्यास निष्पाप लोकांचे जीवन धोक्यात येऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून या वाहनांचा शोध घेतला जात आहे, अशी वाहने आढळून आल्यास त्यांना फिटनेससाठी वाहनमालकांना प्रोत्साहित केले जाईल. - रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद.
आरटीओतील नोंदीनुसार व्यावसायिक वाहनांची संख्या : मीटर बसविलेली वाहने - ५९टुरिस्ट कॅब - ३०६३आॅटो रिक्षा - ३१७१०स्टेज कॅरेजेस - ५९५९कंटेनर कॅरेजेस/मिनीबस - १८५९स्कूल बसेस - १५५७खाजगी सेवा देणारी वाहने -२००४रुग्णवाहिका - ५२४आर्टिफिशियल मल्टी व्हेईकल - २ट्रक/ लॉरिज - १५३९०डिलिव्हरी व्हॅन (चारचाकी)- २८३६४डिलिव्हरी व्हॅन (तीनचाकी)- ३११००