- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४७९ रस्ते अपघातांत तब्बल ५९३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही केवळ प्राणांतिक अपघातांची संख्या आहे. किरकोळ जखमीपासून तर गंभीर जखमी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण यापेक्षा अधिक आहेत. वाढत्या अपघातांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा लाल यादीत समावेश झाला. मात्र, तरीही अपघात कमी होण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.
राज्यात सर्वत्र अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात दररोज कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. हीच परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्याचीही आहे. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. महिन्याला ८ हजार आणि रोज सरासरी २५१ नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत. वाहनांच्या संख्येत दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षात औरंगाबाद शहराचा चारही बाजूंनी झपाट्याने विस्तार झाला. त्यामुळे महामार्ग ओलांडून शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढली. शहर परिसरातील महामार्गांवर अवजड वाहनांचीही सतत वर्दळ असते. या सगळ्यात अरुंद व खड्डेमय रस्ते यासह वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण मिळते आहे.
जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या ९ महिन्यांच्या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यात ४१६ जणांचा अपघातात बळी गेला होता. वर्षाअखेरीस अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ५९३ वर गेली. नव्या वर्षातही अपघातांच्या घटना सुरूच आहेत. वाढत्या अपघातांमुळे नोव्हेंबर २०१९ मध्ये औरंगाबाद जिल्हा लाल यादीत गेला. ही बाब गांभीर्याने घेऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य रस्ता सुरक्षा समितीने तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश पारित केले. त्यानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस स्टेशनचे प्रभारी, मोटार वाहन निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा समावेश असलेल्या वाहन अपघात विश्लेषण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आरटीओ कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षकांची औरंगाबाद शहर व ग्रामीण पोलीस स्टेशननिहाय नियुक्ती केली. त्यांच्या माध्यमातून अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहे. औरंगाबाद शहरात २१ ब्लॅक स्पॉट असल्याचे ६ महिन्यांपूर्वी समोर आल. त्याठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या. तरीही अपघातात जीव जाणे सुरूच आहे.
शहरात ६० टक्के अपघात या भागांतशहरातील ६० टक्के अपघात वाळूज महानगर, छावणी, पडेगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा या भागांतील रस्त्यांवर होत असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात आली. बीड बायपासवरील अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही सांगण्यात आले.
६२५ पेक्षा अधिक लोक जखमीजिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या वर्षभरात ६२५ पेक्षा अधिक लोक जखमी झाले. यात किरकोळ जखमी ते गंभीर रुग्णांचा समावेश आहे. देशात दर चार मिनिटाला रस्ते अपघातात एकाचा बळी जातो. अपघातांमध्ये ३० टक्के अपघात हे दुचाकींचे असतात. अपघातात १५ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्ती मृत्यू पावण्याचे प्रमाण ७२ टक्के आहे.
ही आहेत अपघातांची कारणेअरुंद रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, अशास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक, धोकादायक वळण यासह अतिवेगाने, मद्यपान करून, चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालविणे, भंगार वाहन आणि वाहतूक नियमांच्या पालनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना हातभार लागत आहे.
उपायांसह जनजागृती, कारवाईअपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने अपघात विश्लेषण समितीमार्फत काम केले जात आहे. जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अपघातस्थळी आवश्यक त्या उपाययोजना क रण्यावर भर दिला जातो. त्याबरोबर मानवी चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबर कारवाई केली जाते. - स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
अपघातांची परिस्थिती : एकूण अपघात : मृत्यूऔरंगाबाद शहर : १८१ : १९९औरंगाबाद ग्रामीण : २९८ : ३९४एकूण :४७९ : ५९३