औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ३ हजार ४५४ अंगणवाड्या चालविल्या जातात. कित्येक वर्षांपासून या अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरदोर माता, स्तनदा माता तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसिकरण, पोषण आहार व आरोग्यविषय संदर्भ सेवा दिल्या जातात. तरिही कुपोषणाचा आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही. जून महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात तब्बल ४ हजार ७३३ बालके तीव्र कमी वजनाची आढळून आली आहेत. मे महिन्यात ही आकडेवारी ३ हजार १३१ एवढी होती.
महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या या बाबीकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गरीबीमुळे खायला नाही किंवा कमी मिळते, जेवणातून पुरेसे जीवनसत्व मिळत नाही, यामुळे कुपोषण होते, हा गैरसमज आहे. कुपोषणाची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये आपल्याकडे खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत. त्यामुळे जेवणातून जीवनसत्व, लोह व अन्य घटक मिळत नाहीत. गरोदर माता किंवा स्तनदा मातांमध्ये लोहाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ते पालेभाज्यांमधून मिळते; पण ग्रामीण भागात जेवण केले की चहा पिण्याची सवय असते. त्यामुळे लोह शरीराला मिळत नाही. दुसरीकडे, अल्पवयीन मुलींच्या लग्नाचे प्रमाण अधिक आहे. दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर राखले जात नाही, ही आपल्याकडील कुपोषाची प्रमुख कारणे आहेत. त्यावर अंगणवाडीस्तरावरुन सातत्याने जनजागृती केली जाते. आरोग्याविषयक संदर्भ सेवा दिल्या जातात. पोषण आहार दिला जातो. त्यामुळे काही दिवसांत तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये प्रगती दिसून येते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.