औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर पडत असून, यामध्ये दुचाकी वाहनांचे सर्वाधिक प्रमाण आहे. जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.
आरटीओ कार्यालयातर्फे ४ ते १० फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी आरटीओ कार्यालयात होणाºया नव्या वाहनांच्या नोंदणीविषयी माहिती दिली. जिल्ह्यात मार्च २०१८ पर्यंत १२ लाख ८७ हजार ५८८ वाहने होती. गेल्या दहा महिन्यांत ८० हजार नव्या वाहनांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक ६३ हजार ४७९ नव्या दुचाकींची नोंद झाली असून, महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची नोंद होत असल्याचे दिसते.
शहराबरोबर ग्रामीण भागात दुचाकी खरेदीला अधिक प्राधान्य आहे. सण, उत्सवाच्या कालावधीत सर्वाधिक वाहन खरेदी होते. गेल्या काही वर्षांत शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी वाहन खरेदीकडे ओढा वाढत गेला. काही दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटी बससेवेला सुरुवात झाली आहे. सिटी बसचा अधिकाधिक वापर केल्यास वाढत्या वाहन संख्येवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
२०१० मध्ये ५ लाख वाहनेजिल्ह्यातील वाहनांची संख्या २०१० मध्ये ५ लाख ८३ हजार होती. अवघ्या आठ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाखांवर गेली आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने सुविधेत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते.