औरंगाबाद : जिल्ह्यात मागील ३ वर्षे ८ महिन्यांत ११३५ कोटींचे मुद्रा लोन वाटप करण्यात आले. मात्र, यातील ९० टक्के कर्ज प्रकरणे बोगस आहेत. लाभार्र्थींना याचा लाभ झालाच नाही यात मध्यस्थांनी (दलाल) हात धुऊन घेतले आहे. यातून रोजगार निर्मिती कागदावरच झाली. दलालच श्रीमंत झाले आहेत, असा गंभीर आरोप करीत महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी बँकांना दलालमुक्त करा व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत तुळजापूरकर यांनी सांगितले की, देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने ८ एप्रिल २०१५ रोजी २० हजार कोटी रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिटस् डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेला सुरुवात झाली. ही योजना खूप चांगली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नोव्हेंबर २०१८ पर्यंत ११३५ कोटी रुपयांचे वाटप झाले. त्यात चालू आर्थिक वर्षात ३०५ कोटींचा समावेश आहे. मात्र, यातील ९० टक्के प्रकरणातील कर्जदार बोगस आहेत. दलाली करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी अक्षरश: बँकांना लुटले आहे.
या दलालांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना धमक्या देऊन दबाव आणून कर्ज मंजूर करून घेतले आहेत. कर्ज मंजुरीपैकी लाभार्थीला फक्त २० ते ३० टक्के रक्कम देऊन बाकीची ७० ते ८० टक्के रक्कम दलालांनी हडप केली आहे. मुद्रा लोन योजनेतून बोगस लाभार्थी दाखवून दलाल श्रीमंत झाले आहेत.
तुळजापूरकर पुढे म्हणाले की, आता बँकेच्या व्यवस्थापक, अधिकाऱ्यांवर हल्ले होऊ लागले आहेत. धमक्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. बँकांसमोर तथाकथित सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनांच्या नावाने मंडप उभारून एकानंतर एक ठरवून उपोषणाला बसत आहेत व दबाव आणत आहेत. एवढेच नव्हे तर बोगस कर्ज मंजूर न करणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापकाला अॅट्रॉसिटी कायद्याची धमकी दिली जाऊ लागली आहे. जेएनईसीतील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतील व्यवस्थापकाला धमकी, तर युनियन बँकेच्या शाखेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे आता बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. कधीही काहीही गंभीर घटना होऊ शकते, यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तुळजापूरकर यांनी केली. सर्व बँकांतील अधिकाऱ्यांतर्फे येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना आवर घाला व दलालांपासून बँकमुक्त करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठराविक कापड, भांडे दुकान, ब्युटिपार्लरचे सर्वाधिक कोटेशनदेवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, ११३५ कोटी रुपये मुद्रा लोन वाटप झाले त्यात ठराविक कापड, भांडी दुकानदार व ब्युटिपार्लरचे कोटेशन जोडल्याचे दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झाले त्या तुलनेत दुकाने उघडली नाहीत. कारण, पैसा दलालांच्या खिशात गेला. याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
मुद्रा लोनच्या रकमेतून गुंडगिरी पोसली जातेतुळजापूरकर यांनी आरोप केला की, मुद्रा लोन मिळवून देणारे दलाल कोणत्या एका राजकीय पक्ष, संघटनेचे नाहीत. बोगस लाभार्थीच्या माध्यमातून मिळालेल्या मुद्रा लोनच्या पैशावर शहरातील गुंडगिरी पोसल्या जात आहे. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे मुद्रा लोन मंजूर करून घेण्यासाठी आणखी दबाव वाढत जाईल, ही गंभीर बाबही त्यांनी सर्वांच्या निदर्शनात आणून दिली.
दलालांचे दुष्टचक्र औरंगाबादेतच महाराष्ट्रात आतापर्यंत १ कोटी २६ लाख १०,९७१ लोकांना ६५ हजार ७३३.४१ कोटी रुपयांचे मुद्रा लोन वाटप झाले आहे.दलालांचे दुष्टचक्र फक्त औरंगाबादेतच असल्याचे तुळजापूरकर यांनी सांगितले. बाकीच्या जिल्ह्यात मुद्रा लोनची अंमलबजावणी चांगली आहे, असे ते म्हणाले.