औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानभरपाईसाठी २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३ लाख ८२ हजार २४० शेतकर्यांनी कापसाची लागवड केली होती. त्यांना बोंडअळीमुळे फटका बसला आहे. ३ लाख १४ हजार ८०३ हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली होती.
पूर्वीच्या पंचनाम्यानुसार २७० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव होता. तो दुरुस्तीसह पाठविण्यात आला असून, आता २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांची नुकसानभरपाईसाठी गरज आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्यांची संख्या ३ लाख ७३ हजार १२२ इतकी आहे. त्या शेतकर्यांचे ३ लाख १४ हजार ८०३ हेक्टरवरील कापसाचे पीक वाया गेले आहे. या शेतकर्यांना १६६ कोटी ५६ लाख ८५ हजार ९०८ रुपये भरपाईसाठी लागतील, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्यांना ४२ कोटी ८६ लाख ४४ हजार ८०० रुपये लागतील, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे दिला आहे.
या तालुक्यांतील पिकाचे नुकसानऔरंगाबाद शहर परिसरातील औरंगाबाद, भावसिंगपुरा, उस्मानपुरा, कांचनवाडीतील २,७३० शेतकर्यांनी लावलेल्या कापसाच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले. तालुक्यातील चौका, करमाड, लाडसावंगी, हर्सूल, चित्तेपिंपळगाव, चिकलठाणा येथील ५४ हजार ८०३, पैठण तालुक्यातील आडूळ, बालानगर, बिडकीन, लोहगाव, पाचोड, पैठण, विहामांडवा, ढोरकीन, पिंपळवाडी, नांदर येथील ७६ हजार ३१७ शेतकर्यांचे, तर लाडगाव, लासूरगाव, शिऊर, बोरसर, नागमठाण, लोणी खु., तुर्काबाद, गंगापूर, हर्सूल, मांजरी, शेंदुरवादा, वाळूज, सिद्धनाथ वडगाव, भेंडाळा, डोणगाव या गंगापूर तालुक्यातील ९ हजार २३ शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. खुलताबाद तालुक्यातील सावंगी, सुलतानपूर, वेरूळ येथील २५ हजार १२९, कन्नड तालुक्यातील चापानेर, चिकलठाण, नाचनवेल येथील ३० हजार ६१७, तर सोयगाव तालुक्यातील बनोटी, सोयगाव, सावळदबारा येथील २६ हजार ७९१ शेतकर्यांच्या कापसाचे पीक बोंडअळीमुळे वाया गेले.