वैजापूर : मागील वर्षी नागपूर शहर पोलीस पदाच्या झालेल्या भरतीत डमी उमेदवार ( Police Recruitment Scam) बसविल्याप्रकरणी नागपूर व पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने वैजापूर तालुक्यातील संजपूरवाडी व तरट्याची वाडी येथील दोन जणांना ताब्यात घेतले असून, दोघे फरार झाले आहेत. तर फुलंब्री, पैठण व गंगापूर तालुक्यातील काही नावेही निष्पन्न झाल्याने जिल्हाभर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर पोलीस आयुक्तालयाकडून मागील वर्षी ऑगस्ट महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली तसेच परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. या पोलीस भरतीसाठी वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी येथील अर्जुन चुडामण जारवाल, जयलाल कारभारी काकरवाल व सुनील नागलोत या तिघांनी अर्ज भरले होते.
मात्र, लेखी तसेच शारीरिक चाचणीत या तिघांनी स्वतः परीक्षा न देता दुसरेच उमेदवार बसविल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागपूर पोलिसांचे एक पथक शहरात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी सकाळी संजरपूर वाडीतून जयलाल काकरवाल याला ताब्यात घेतले. यातील अर्जुन जारवाल व सुनील नागलोत हे दोघे परीक्षार्थी मात्र पथक येण्यापूर्वीच फरार झाले. तर बुधवारी सकाळीच पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील डमी पोलीस भरतीप्रकरणी दुसरे एक पथक येऊन त्यांनी तरट्याची वाडी येथून चरणसिंह मानसिंह काकरवाल याला ताब्यात घेतले. तर दुसऱ्या एका पथकाने हुसेनपूर(ता. पैठण) येथून एकाला ताब्यात घेतले आहे.
मुख्य सूत्रधार वैजापूर तालुक्यातील?पिंपरी चिंचवड भरतीतील मुख्य सूत्रधार हा वैजापूरमधील शिऊर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, त्याचे नाव पथकाने व स्थानिक पोलिसांनी उघड केले नाही. विशेष म्हणजे परीक्षेसाठी वापरण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रासह ही पथके शहरात दाखल झाली आहेत. या यंत्रामुळे मूळ उमेदवार व परीक्षा दिलेला डमीचे ठसे घेऊन तांत्रिकदृष्ट्या ओळख पटविण्यात येत आहे.
तेरा लाख रुपयांत झाला होता सौदादरम्यान, नागपूर भरतीत लेखी परीक्षेत एक तर शारीरिक चाचणीसाठी दुसराच उमेदवार उभा करण्यात आला होता. शिवाय संशयित असलेल्या एकाचे नाव तर नागपूर व पिंपरी चिंचवड या दोन्ही पथकांच्या यादीत आहे. भरतीत सहभागी न होता पात्र होण्यासाठी तब्बल १३ लाख रुपयांत मूळ परीक्षार्थी व डमी उमेदवारांत सौदा झाला होता. मात्र, आयुक्तालयांच्या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये भरतीतील गैरप्रकार उघड झाला. व पितळ उघडे पडले. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील काही ठराविक गावांतील उमेदवार सापडत असल्याने तपास यंत्रणेचे लक्ष औरंगाबादवर केंद्रित झाले आहे.