औरंगाबाद : जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण शहराच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे २२ मेपासून औरंगाबाद शहर रेडझोनमध्ये, तर उर्वरित सर्व भाग नॉन रेडझोनमध्ये असणार आहे. नॉन रेडझोन भागात सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्स, बार वगळून सर्व काही सुरू राहणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी सांगितले, तसेच तालुक्यातून तालुक्यात जाण्यासाठी एस.टी.सेवा सुरू करण्यात येणार असून, शहरात एस.टी. बंद असेल. ज्यांना तालुक्यातून शहरात यायचे असेल त्यांना मनपाच्या सीमेपर्यंत आणून सोडण्यात येईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, ग्रामीण भागात २२ मे पासून सायंकाळी ७ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू असेल. महापालिका परिसर रेडझोनमध्ये आहे. त्याबाबत मनपा आयुक्त निर्णय घेतील. २२ मेपासून ३१ मेपर्यंत ग्रामीण भागासाठी मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार आदेश पारित करण्यात येणार आहेत. या आदेशात काही अटी व शर्तींचा उल्लेख आहे. त्याचे अवलोकन करून जिल्हा प्रशासन आदेश काढणार आहे.
एस.टी.मध्ये सोशल डिस्टन्सिंंगचा वापरजिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, २२ मेपासून एस.टी. बस सुरू करण्यात येत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंंगचा वापर करून प्रवासी वाहतूक सुरू होईल. एका बसमध्ये २२ ते २५ प्रवासी सोशल डिस्टन्सिंंगनुसार प्रवास करू शकतील. पैठण ते कन्नड, सिल्लोड ते कन्नड, गंगापूर ते वैजापूर अशा पद्धतीने एस.टी. सेवा सुरू होईल. पालिका हद्दीतील कोणत्याही स्थानकावर एस.टी. बस ये-जा करणार नाही.