औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभागाने ८७.२९ टक्के निकाला नोंद करत राज्यात चौथे स्थान पटकावले. मात्र मागील २०१४ पासून सर्वात निच्चाकी निकालाची नोंदही यावर्षी झाली आहे.
बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान विभागातील ३८८ केंद्रांवर घेण्यात आल्या होत्या. यात १२४० कनिष्ठ महाविद्यालयातील १ लाख ६२ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी उपस्थिती होती. राज्याचा निकाल ८५.८८ टक्के एवढा लागला आहे. त्यातुलनेत औरंगाबाद विभागाने ८७.२९ टक्के एवढा निकाल नोंदवला. मागील सहा वर्षातील हा सर्वात कमी निकाल आहे. २०१४ साली औरंगाबाद विभागाचा निकाल ९०.९८ टक्के एवढा लागला होता. त्यानंर २०१५ मध्ये ९१.७७, २०१६ मध्ये ८७.८०, २०१७ मध्ये ८९.८३, २०१८ मध्ये ८८.७४ आणि यावर्षी सर्वात कमी निकाल हा ८७.२९ इतकाच लागला आहे. त्यापुर्वी २०१२ मध्ये ६७.१० टक्के आणि २०१३ मध्ये ८५.२६ टक्के निकालाची नोंद झाली होती.
औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वात जास्त ८९.२२ टक्के निकाल लागला आहे. तर विभागात सर्वात कमी निकाल ८०.७७ टक्के हिगोंली जिल्ह्याचा लागला आहे. या निकालात बीड जिल्हा ८८.२७ टक्के, जालना ८७.१२ टक्के आणि परभणी जिल्ह्याचा निकाल ८४.५१ टक्के एवढा लागला आहे. मागील सहा वर्षात सर्वात कमी निकाल कॉपी मुक्त अभियान राबविल्यामुळे लागला असल्याचा दावा विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत केला. यावर्षीच्या परीक्षेत विभागातंर्गत सर्वच जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याचे हे परिणाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विभागात मुलींची बाजी कायमबारावीच्या परीक्षेत विभागामध्ये मुलींनी यावर्षीही बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.८६ असून, मुलांची ८५.०९ एवढी आहे. यात १ लाख ५६२ मुलांपैकी ८५ हजार ४१० मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या ६२ हजार ८४ पैकी ५६ हजार २९५ उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे मुलींनीच टक्केवारीत बाजी मारली आहे.