औरंगाबाद : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ३९.११ तर बारावीचा २७.६३ टक्के लागला. राज्यात औरंगाबाद विभाग अव्वल ठरल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व प्रभारी विभागीय अध्यक्ष सुगता पुन्ने, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे व शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा राज्याचा दहावीचा एकूण निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा एकूण निकाल १८.४१ टक्के लागला. विभागात दहावीसाठी ६८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४७८ विद्यार्थी म्हणजेच ३९.११ टक्के उत्तीर्ण झाले. तर बारावीसाठी ६९५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९२९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातून १९१४ म्हणजेच २७.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
राज्यभरातून बारावीसाठी विज्ञान, कला, वाणिज्य, एचएससी व्होकेशनल या चार शाखांसाठी ९ विभागीय मंडळातून ६९ हजार ५४२ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९ हजार २७४ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दहावीसाठी ९ मंडळांतून ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातून ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९८१२ एवढी असून हे विद्यार्थी एटीकेटी सवलतीद्वारे ११ वी प्रवेशाला पात्र ठरतात. गुणपडताळणी करण्यासाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे, असे पुन्ने यांनी सांगितले. यावेळी बोर्डाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
---
अकरावी प्रवेशप्रक्रियेत घेता येईल सहभाग
---
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला उशीर झाला आहे. तसेच हा निकाल लवकर लागला. त्यामुळे सध्या विशेष फेरी सुरू असून पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले दहावीचे विद्यार्थी अकरावी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊ शकतील असे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण म्हणाले. तर उपशिक्षणाधिकारी अनिल साबळे यांनी यासाठी स्वतंत्र फेरीच्या सूचना शासनाकडून मिळतील असे सांगितले.
---