औरंगाबाद : शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या खरेदीला लालफितीचा फटका बसला आहे. सीसीटीव्ही खरेदीची निविदा प्रक्रिया महानगरपालिकेचे शहर अभियंता सिकंदर अली करणार असून, त्यांनाच याविषयी विचारा, अशी संतप्त प्रतिक्रिया पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सीसीटीव्हीच्या प्रकल्पाविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिली.
दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या दंगलीत पोलिसांनी बहुचर्चित ड्रोनचा वापर का केला नाही, असा प्रश्न पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग क रून औरंगाबादला देशातील सर्वाधिक सुरक्षित आणि क्राईमलेस शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण करण्याची आपली संकल्पना आहे.
ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी चिली ड्रोन, कलर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे आपण यापूर्वीही प्रात्यक्षिकांसह सांगितले आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद शहराला १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यात ट्रॅफिक इंटेलिजन्स सिस्टीम अंतर्गत २५ कोटींचा समावेश आहे. या निधीतून पहिल्या टप्प्यांतर्गत १ हजार सीसीटीव्ही आणि चार ड्रोन कॅमेरे खरेदी करण्यात येत आहेत.
ड्रोन आणि सीसीटीव्ही खरेदी प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम महानगरपालिकेस देण्यात आले. ही निविदा प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, यासाठी पोलीस आयुक्त मनपाचे शहर अभियंता सिकंदर अली यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र निविदा प्रक्रिया सुरू होत नसल्याने याविषयी नाराजी व्यक्त करून सिकंदर अली यांना विचारा, असे उत्तर दिले.