लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवून तडीपारीची कारवाई करीत असल्याचा आरोप, शिवसेना उपनेते तथा खा. चंद्रकांत खैरे यांच्या शिष्टमंडळाने केला. शहर पोलीस दलाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील तब्बल १५० जणांवर तडीपारीची कारवाई सुरू केली. यातील काही जणांच्या तडीपारीचे आदेशही काढण्यात आले. यात शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शनिवारी सकाळी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना सांगितले की, आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना तडीपारीचे टार्गेट दिले आहे. गुन्हेगारांना तडीपार करण्यासंदर्भात आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, सामाजिक कामे करीत असताना ज्या शिवसेना कार्यकर्त्यांवर किरकोळ स्वरूपाचे हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत, अशांना गुन्हेगार ठरवून तडीपार केले जात आहे. तडीपारीची नोटीस मिळालेल्या व कारवाई झालेल्या काही कार्यकर्त्यांची नावे आयुक्तांना दिली.भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ केल्याचा आरोप असलेल्या एका कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस देण्यात आली. पुंडलिकनगरातील अवैध दारूअड्ड्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना सतत मदत करणाºया कार्यकर्त्याविरोधात दाखल खोट्या गुन्ह्याच्या आधारे कारवाई केली जात आहे. वाळूज एमआयडीसीतील एका कार्यकर्त्याला चार महिन्यांपूर्वी एका आमदाराने तडीपार करण्याची धमकी जाहीर कार्यक्रमात दिली होती. त्या आमदाराच्या सांगण्यावरून शिवसेना कार्यकर्त्यास तडीपार केल्याचे ते म्हणाले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सिल्लोड येथील एका पदाधिकाºयाविरोधात खोटा गुन्हा पोलिसांनी नोंदविल्याचा आरोप करण्यात आला. चुकीची तडीपारीची कारवाई रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आ. संजय सिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, राजू वैद्य, अनिल पोलकर, विकास जैन, किशोर कच्छवाह, सुनीता आऊलवार, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे उपस्थित होते.
औरंगाबादेत भाजपमुळेच तडीपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:16 AM
भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवून तडीपारीची कारवाई करीत असल्याचा आरोप, शिवसेना उपनेते तथा खा. चंद्रकांत खैरे यांच्या शिष्टमंडळाने केला. शहर पोलीस दलाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील तब्बल १५० जणांवर तडीपारीची कारवाई सुरू केली. यातील काही जणांच्या तडीपारीचे आदेशही काढण्यात आले. यात शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
ठळक मुद्देसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे : शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा आरोप