जिल्ह्यासह राज्यभरातील रुग्णांवर उपचार : घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्राॅन, खाजगी रुग्णालयांत डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट रुग्णसेवा
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाकाळात औरंगाबादची वैद्यकीय सेवा खऱ्या अर्थाने सर्वोत्तम ठरली. कारण राज्यभरातील अनेक शहरांत जेव्हा ना रेमडेसिविर मिळत होते, ना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, तेव्हा औरंगाबादेत या गोष्टी अगदी सहजपणे मिळाल्या. त्यामुळे रेमडेसिविर, व्हेंटिलेटर मिळण्यासाठी पुणे अहमदनगरसह राज्यभरातील रुग्णांनी औरंगाबादेत धाव घेतली. घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्राॅन, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, खाजगी रुग्णालयांत डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करीत उत्कृष्ट रुग्णसेवा दिली.
मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात १५ मार्च २०२० रोजी कोरोनाने शिरकाव केला. या दिवशी जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. या सगळ्यात घाटी रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार व सुविधा वाढविण्यात आल्या. घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅक कोरोनाच्या रुग्णसेवेसाठी सज्ज करण्यात आले. अवघ्या काही दिवसांत महापालिकेचे मेल्ट्राॅन रुग्णालय उभे राहिले. खाजगी रुग्णालयांनीही खाटा आणि उपचार सुविधा वाढविल्या. महापालिकेने मेल्ट्राॅन आणि कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा दिली.
दुसऱ्या लाटेत कोरोनाने अक्षरश: कहर केला. राज्यातील अनेक शहरांत कोरोना रुग्णांना उपचारासाठी गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यातुलनेत औरंगाबादची परिस्थिती अनेक पटीने चांगली राहिली. त्यामुळे मराठवाड्यासह अहमदनगर, जळगाव, नाशिक, पुण्यासह इतर जिल्ह्यांतील कोरोना रुग्ण औरंगाबादेत दाखल झाले. आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील रुग्णांसह अन्य जिल्ह्यांतील रुग्णांनाही सक्षमपणे रुग्णसेवा दिली. जिल्ह्यात २४ तासांत तब्बल ६० टन ऑक्सिजन संपत होता. ऑक्सिजन येतो आणि संपतो, अशी स्थिती होती; पण कोणतीही आणीबाणीची स्थिती शहरात निर्माण झाली नाही. या सगळ्यात रुग्णसेवा देताना अनेक डाॅक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारीदेखील कोरोनाला सामोरे गेले; पण सगळ्या परिस्थितीला सामोरे जात रुग्णसेवा गेल्या दीड वर्षापासून सुरळीत ठेवली आहे.
------
घाटीतील प्रयोगशाळा राज्यात अव्वल
राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यास ३-३ दिवस लागत होते; परंतु औरंगाबादेत अवघ्या एका दिवसाच्या आत कोरोनाचा अहवाल मिळतो. त्यातून निगेटिव्ह रुग्ण सुटकेचा नि:श्वास सोडतात. हे सगळे घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेमुळे (व्हीआरडीएल) शक्य होत आहे. आरटीपीसीआर तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये ही प्रयोगशाळा राज्यात अव्वल आली. या यशाच्या मानकरी ठरल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे.
----
कोरोनाला सक्षमपणे सामोरे
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्यावेळी सुरुवातीला अडचणी आल्या. प्रारंभी केवळ मेडिसीन विभागाला ऑक्सिजनची पाइपलाइन होती; परंतु नंतर ऑक्सिजनसह सर्वच सुविधा वाढल्या आणि चांगली सेवा देता आली. सुविधा वाढल्याने कोरोनाला सक्षमपणे सामोरे जात येत आहे.
- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
---
कधीही न पाहिलेली स्थिती
कोरोनामुळे भूतकाळात कधीही न पाहिलेली स्थिती पाहायला मिळाली. उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात ग्रामीण भागात चांगली रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोविड सेंटरसह ग्रामीण भागात खाजगी रुग्णालयांनी रुग्णसेवा दिली.
-डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
---
मेल्ट्रॉन ठरले महत्त्वपूर्ण
कोरोनाच्या उपचारासाठी मेल्ट्राॅन सुरू झाले. या महिन्यात या रुग्णालयाला वर्ष झाले. येथे अनेक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. उपचारासाठी नवीन उपकरणे मिळाली आहेत.
- डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा