- बापू सोळुंके
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत जास्तीत जास्त गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या शर्यतीत वाळूज पोलिसांनी चक्क मरण पावलेल्या रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवरच प्रतिबंधात्मक (चॅप्टर केस) कारवाई केल्याचे समोर आले.
निवडणुकीत कोणतीही गडबड होऊ नये, याकरिता रेकॉर्डवरील अवैध दारू विक्रेते, जुगार अड्डे चालविणारे, तसेच हाणामारीचे गुन्हे असलेल्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सर्व ठाणेदारांना दिले होते. विशेष म्हणजे रोजच्या रोज केलेल्या कारवाईचा अहवाल पोलीस आयुक्तांमार्फत निवडणूक आयोगाला पाठविला जात असे. १० मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून या कारवाई वेग वाढला. जास्त प्रतिबंधात्मक केसेस करण्यावर ठाणेदारांचा भर होता. त्यात वाळूज पोलिसांनी मात्र चक्क मरण पावलेल्या तीन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून चॅप्टर केस केली.
दरम्यान, याविषयी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्या हद्दीतील अनेक गुन्हेगार गायब आहेत. निवडणूक कालावधीत मृतावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली असल्यास याबाबत चौकशी केली जाईल.
उदाहरण क्रमांक १सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बकवालनगर येथील मिलिंद रावसाहेब थोरात हे अर्धांगवायूच्या आजारामुळे सहा महिन्यांपूर्वी मरण पावले. त्यांच्याविरोधात वाळूज पोलिसांनी २२ मार्च रोजी चॅप्टर केस क्रमांक ५८/२०१९ ही एसीपी छावणी यांच्याकडे दाखल केली. मिलिंद थोरात यांच्याविरोधात पोलिसांच्या रेकॉर्ड काही गुन्हे होते.
उदाहरण क्रमांक २वाळूजमधील साठेनगर येथील गोपाल उमेश पवार यांचा सुमारे दीड वर्षापूर्वी भेंडाळा फाट्याजवळ रस्ता अपघातात मृत्यू झाला. असे असताना ते हयात आहेत अथवा नाही, याबाबत शहानिशा न करता वाळूज पोलिसांनी त्यांच्याविरोधात २२ मार्च रोजी चॅप्टर केस क्रमांक ५४/२०१९ ही दाखल केली.
उदाहरण क्रमांक ३रांजणगाव परिसर, एकतानगरातील हयात नसलेल्या एका व्यक्तिविरोधात वाळूज पोलिसांनी चॅप्टर केस एसीपी कार्यालयास पाठविली होती. त्याच्याविरोधात अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्याची वाळूज ठाण्यात नोंद होती.