औरंगाबाद पूर्व मतदारसंघासाठी महायुतीचे ठरलं! कॉँग्रेस, एमआयएममध्ये 'वेट अँड वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:33 PM2024-10-22T12:33:16+5:302024-10-22T12:34:01+5:30
काँग्रेसने मुस्लिम उमेदवाराला संधी देण्याची मागणी; एमआयएमचे अद्याप ठरेना
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास मंगळवारपासून (दि. २२) सुरुवात होत आहे. शहरातील पूर्व मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणांगणात महायुतीचे भाजप उमेदवार गृहनिर्माणमंत्री अतुल सावे हे एकच योद्धा सध्या समोर आहेत. एमआयएम व महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पूर्व मतदारसंघ काँग्रेसकडे जाण्याचे घाटत आहे. त्यातच काँग्रेस आणि एमआयएमची युती होण्याच्या चर्चेने राजकीय धुरळा उठला आहे. उद्धवसेनेचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु, जागा वाटपाचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच असल्याने ते ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
दुसरीकडे काँग्रेसने पूर्व मतदारसंघातून मुस्लिम उमेदवाराला संधी द्यावी, यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे मागणी लावून धरली आहे. त्या मागणीचा काँग्रेस श्रेष्ठी कसा विचार करतात, याकडे मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. एमआयएमने उमेदवारांचे पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. काँग्रेससोबत एमआयएमची बोलणी सुरू असल्याच्या चर्चेमुळे दोन्ही पक्ष उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ घेत असल्याची चर्चा आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपने पूर्व मतदारसंघात उद्धवसेनेस भगदाड पाडणे सुरूच ठेवले आहे. दीड महिन्यात डझनभर प्रवेश सोहळे झाले असून, उद्धवसेना व युवा सेनेच्या अनेकांनी गृहनिर्माणमंत्री सावे यांच्या नेतृत्वात भाजपचा झेंडा हाती घेतला. या मतदारसंघातून जर महाविकास आघाडीने कुठलाही उमेदवार लादला तर उद्धवसेनेचे लढवय्ये भाजपच्या गोटात जमा होऊ शकतात.