भाजपचे राज्यमंत्री अतुल सावे आणि एमआयएमचे गफ्फार कादरी यांच्यात विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात 'काटे की टक्कर' झाली. यात सावे यांनी जवळपास १३, ९०० मतांनी विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये सावे यांना ९३, ९६६ मते मिळाली. तर एमआयएमच्या गफ्फार कादरी यांना ८०,०३६ मते मिळाली.
पहिल्या फेरीपासून ही लढत अत्यंत लक्षवेधी झाली. यात मतांचे पारडे कधी कादरी यांच्याकडे तर कधी सावे यांच्याकडे झुकत होते. मात्र शेवटी सावे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय साकार केला. २०१४ साली भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी पंचरंगी लढत झाली होती. या लढतीत भाजप उमेदवार तथा विद्यमान राज्यमंत्री आ. अतुल सावे यांचा निसटता विजय झाला होता. परंतु यावेळी आ. सावे आणि एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात आमने-सामनेची लढत झाली. मताचे संभाव्य विभाजन टाळणे, प्रचार यंत्रणाचे सूक्ष्म नियोजन यामुळे सावे यांना दोलायमान स्थितीतही आरामात विजय मिळवता आला अशी चर्चा आहे.