औरंगाबाद : महापालिकेच्या पथकाने बुधवारी दमडी महल येथील अतिक्रमण पाडल्याचे पडसाद दुसर्या दिवशीही उमटले. अतिक्रमण पाडल्याची कारवाई चुकीची असल्याचे मत महापौरांनी मांडले. त्याचवेळी स्थायी समिती सभापतींनी मात्र ही कारवाई योग्यच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या वादात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अचानक उडी घेत या वादाला फोडणी दिली.
अतिक्रमण पाडल्याप्रकरणी आयुक्तांनी व्हिडिओ चित्रीकरण करून या प्रकरणाची चौकशी करावी व त्याचा दोन दिवसांत अहवाल द्यावा, अशी मागणी करणारे पत्र महापौर नंदकुमार घोडले यांनी दिले आहे, तर दुसरीकडे भाजपचे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी कारवाई योग्यच असल्याचे सांगत आपण प्रशासनाच्या पाठीशी असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय ते चंपा चौक या रस्त्यावरील दमडी महलशेजारी असलेल्या श्रीराम पवार यांच्या घरावर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने बुधवारी कारवाई केली होती. मात्र, पवार यांना वेळ मिळावा यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे एमआयएमने हे अतिक्रमण हटविण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. त्यात स्थायी समिती सभापती बारवाल यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश देत शिवसेनेची कोंडी केली.
दरम्यान, अतिक्रमण हटविल्यावरून संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या सदस्यांनी गुरुवारी महापालिकेत धडक दिली. त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. मात्र, आयुक्त बैठकीनिमित्त बाहेर असल्याने ते महापौरांकडे गेले. जागा महसूल विभागाची असताना चुकीच्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली असून, कारवाईसाठी दबाव टाकणार्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होईल, अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कारवाईसाठी दबाव आणणार्या राजकीय लोकांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली. त्यावर महापौरांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्तांना पत्र देण्यात येत असून, दोन दिवसांत अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय होईल, असे स्पष्ट केले.