औरंगाबाद : स्टार्टअप योजनेतून उद्योग सुरू केलेल्या देशभरातील उद्योजकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. परंतु औरंगाबादेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी उद्योजकांनाच डावलण्यात आले. अवघ्या ९ उद्योजकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी ९.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स होती. यामध्ये औरंगाबादेतील उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्टार्टअप उपक्रमांतर्गत देशभरात अनेक ठिकाणी नवीन उद्योग सुरू झाले. या योजनेची फलनिष्पत्ती, आणि अडचणी यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार होती. परंतु प्रत्यक्षात काही उद्योजकांनाच आमंत्रण मिळाले. अनेकांना व्हिडिओ कॉन्फरन्सची साधी कल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांना हजर राहता आले नाही.
‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, मसिआ या विभागासाठी काम करीत आहे. परंतु पंतप्रधानाची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, याची साधी माहितीही देण्यात आली नाही. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ म्हणाले, ‘सीएमआयए’च्या इन्क्युबेशन सेंटरचे तीन प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु मुंबई, पुण्यासह औरंगाबादलाही संवादाची संधी मिळाली नाही. कौशल्य विकास केंद्राचे अधिकारी म्हणाले, नवउद्योजकांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये ९ जणांची उपस्थिती होती.
केवळ ऐकण्याची संधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू, गुवाहाटीसह विविध ठिकाणच्या लोकांशी संवाद साधला. मात्र, औरंगाबादेतील उद्योजकांना पंतप्रधानांबरोबर बोलण्याची संधीच मिळाली नाही. पंतप्रधानांचा इतरांबरोबर झालेला संवाद ऐकावा लागला. त्यामुळे काही बाबी मांडता आल्या नाहीत, अशी खंतही उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केली. परंतु कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अधिकाºयांनी मार्गदर्शन केल्याचेही ते म्हणाले.