लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई विद्यापीठाच्या विधिसह इतर अभ्यासक्रमांच्या ५ हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आॅनलाइन पाठविण्यात आल्या आहेत. या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ३१ जुलै रोजी निकाल घोषित करण्याचा मुहूर्त हुकल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याची दखल विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेत ३१ जुलैपूर्वी निकाल लावण्याचे आदेश कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दिले होते.राज्यपालांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नागपूर, पुणे येथील विद्यापीठांकडे काही अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आॅनलाइन पाठविल्या होत्या. याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडेही ५ हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका आॅनलाइन पाठविण्यात आल्या आहेत. या उत्तरपत्रिका तपासणीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधि शाखेच्या १०० प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाच्या अधिकाºयांकडे सोपवली होती. या प्राध्यापकांकडून आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात करतानाच तांत्रिक अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली. यामुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयातील संगणक लॅबमधून या उत्तरपत्रिका व्यवस्थापनशास्त्र विभागात तपासण्याचा निर्णय झाला; मात्र मुंबई विद्यापीठाने उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी दिलेला पासवर्ड जुळत नसल्यामुळे कामकाज सुरूच झाले नाही. शनिवारी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. तरीही तांत्रिक अडचणी दूर होऊ शकल्या नाहीत. यामुळे मुंबई विद्यापीठातील अधिकारी या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी मुंबईला परतल्याचे समजते. ते पुन्हा औरंगाबादेत पोहोचल्यानंतरच उत्तरपत्रिका तपासण्यासंदर्भात निर्णय होईल, असेही सूत्रांनी सांगितले. यामुळे ३१ जुलैपर्यंत उत्तरपत्रिका तपासून देण्याचा मुहूर्त हुकला आहे.
मुंबईची परीक्षा; औरंगाबाद नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:12 AM