औरंगाबाद : शासकीय सेवेत २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने राष्ट्रीय पेन्शन योजना अंमलात आणली. या योजनेची अंमलबजावणी करणारी औरंगाबाद महापालिका ( Aurangabad Municipality ) राज्यात पहिली ठरली आहे. महापालिकेतील तब्बल १२०० कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अत्यंत क्लीष्ट योजना लागू करण्यामध्ये प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सिंहाचा वाटा उचलला. ( Aurangabad is the first Municipality in the state to implement the National Pension Scheme)
औरंगाबाद महापालिकेतील वर्ग २ ते वर्ग ४ मधील १२०० कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अखेर लागू झाली. या कर्मचाऱ्यांचे पेन्शन योजनेत १० टक्के अंशदान जमा केले जात असून मनपाकडून १४ टक्के हिस्सा टाकला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कपात होत आहे. परंतु राष्ट्रीय पेन्शन योजना १ नोव्हेंबर २००५ पासून लागू झाल्यामुळे मागील १६ वर्षांचे हप्ते यामध्ये जमा करावे लागणार आहेत. महापालिकेकडून चालू महिन्याच्या हप्त्यासोबत मागील एक हप्ता पगारातून कपात करण्याचे नियोजन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी १६ वर्षांची एकत्रित हप्त्याची रक्कम जमा करण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना परवानगी दिली जाईल. मनपाला देखील १४ टक्के हिस्सा जमा करावा लागणार असून तसा लिखित करारच महापालिकेने भविष्य निर्वाह निधी कार्यालयासोबत केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर चांगली रक्कम मिळणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या रकमेवर टक्केवारीप्रमाणे व्याज जमा होणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या नावाने पॅन कार्ड मिळणार असून, त्यामध्ये कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती असणार आहे. नगररचना विभागातील उपअभियंता संजय कोंबडे यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेचे पहिले पॅन कार्ड प्राप्त झाले आहे.
राज्यातील एकाही महापालिकेत या योजनेची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही, औरंगाबाद महापालिकेला पहिला मान मिळाला. योजना लागू करण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय परिश्रम घेत होते. याशिवाय मुख्य लेखाधिकारी डॉ. देविदास हिवाळे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनीही मोलाचा वाटा उचलला.
सेवानिृवत्तीनंतर रक्कम काढूनही पेन्शन मिळेलमहापालिकेतील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास राष्ट्रीय पेन्शन योजनेत जमा झालेली रक्कम काढायची असेल, तर तो काढू शकतो. तसेच जेवढ्या रकमेची पेन्शन सुरू करायची असेल त्या प्रमाणात तेवढी रक्कम राष्ट्रीय पेन्शन योजनेत ठेवल्यास पेन्शनही घेता येईल.
कुटुंबातील वारसदारास पेन्शनचा लाभमनपा कर्मचाऱ्यास राष्ट्रीय पेन्शन योजना लागू झाल्यामुळे याचा फायदा त्यांच्या कुटुंबातील वारसदारास देखील मिळणार आहे. पेन्शन योजनेच्या अर्जामध्ये नॉमिनी असलेल्या वारसदारास देखील पेन्शनचा लाभ घेता येणार आहे.