औरंगाबादःशिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पत्रक जाहीर केले. यात औरंगाबाद महापालिकेचे माजी आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना आता औरंगाबादचे जिल्हाधिकारी करण्यात आले आहे. तसेच, विद्यमान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई येथे करण्यात आली आहे.
9 डिसेंबर 2019 मध्ये आस्तिक कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात सत्तांतराचे महानाट्य सुरु असतानाच तत्कालीन ठाकरे सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांची बदली करुन, त्यांच्याजागी डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून पांडेय यांच्याकडे कोणतेच पद नव्हते.
औरंगाबाद शहरात IAS आस्तिक कुमार पांडेय आणि त्यांच्या पत्नी IPS मोक्षदा पाटील खूप लोकप्रिय आहेत. ही IAS-IPSची जोडी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने पांडेयंनी प्रशासक म्हणून एकहाती कारभार पाहिला होता. स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणूनही त्यांनी काम पाहिले. स्मार्ट सिटी बस, गुंठेवारी योजना, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मनपाच्या शाळेत सीबीएसई पॅटर्न आदी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. कोरोना काळातही त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती.