- नजीर शेख
औरंगाबाद: दोन वेळा शहराचे महापौरपद भुषविलेले आणि अवघ्या सव्वा वर्षांपूर्वी राज्यसभेचे खासदार झालेले डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधीत डॉ. कराड यांना मिळालेले मंत्रिपद ही आश्चर्यजनक बाब असली तरी मागील काही दिवसांत त्यांनी पक्षासोबत ठेवलेली बांधीलकी आणि विशेष करून राज्यातील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेली जवळीक त्यांच्या कामी आल्याचे दिसते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मराठवाड्यातून एकाची वर्णी लागणार, याची चर्चा मागील काही दिवसांपासून होती. डॉ. कराड आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती; मात्र त्यामध्ये डॉ. कराड यांनी बाजी मारली. सरळसाधे वाटणारे डॉ. कराड हे चाणाक्षही असल्याची प्रचिती यामुळे आली. ( Cabinet Reshuffel :Aurangabad gets first chance in Union Cabinet)
औरंगाबादच्या दृष्टीने डॉ. कराड यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा शहराच्या आगामी काळातील योजनांच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. औरंगाबादचे खासदार म्हणून आतापर्यंत चंद्रकांत खैरे यांनी चार वेळा खासदारपद भूषविले; मात्र तरीही त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नाही. ६५ वर्षीय डॉ. कराड यांची नगरसेवक ते खासदार (व्हाया महापौर) आणि आता केंद्रीय मंत्री अशी २४ वर्षांची कारकीर्द आहे. मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन असलेल्या डॉ. कराड यांनी १९९५ साली नगरसेवक होण्याआधी लायन्स क्लबच्या माध्यमातून आपले सामाजिक काम सुरू ठेवले होते. त्याचा फायदा त्यांना नगरसेवक होण्यामध्ये झाला. त्यानंतर १९९६ साली ते भाजपमध्ये आले आणि तिथून त्यांची राजकीय कारकीर्द आणखी बहरत गेली. गरिबी पाहिलेला आणि कोणताही अभिनिवेष नसलेला नेता म्हणून डॉ. कराड यांची ख्याती आहे. एक डॉक्टर, उद्योजक, संघटक आणि सामाजिक कार्यकर्ता अशा विविध अंगांनी त्यांच्या कारकीर्दीकडे पाहिले जावू शकते. कुणाविषयीही कटूता बाळगायची नाही, या त्यांच्या गुणाचा त्यांना राजकारणात मोठा फायदाच झालेला आहे. यामुळेच औरंगाबाद शहराचे दोन वेळा महापौरपद त्यांना भूषविता आले.
गोपीनाथ मुंडेंचे सहकार्यऔरंगाबामध्ये एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व राहिले असताना दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांनी पक्षविस्ताराच्या दृष्टीने डॉ. कराड यांना पक्षात आणले. मुंडे यांच्या आशीर्वादामुळे ते दोन वेळा महापौरही झाले. गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर डाॅ. कराड यांनी पंकजा मुंडे यांना नेता मानले. पंकजा राज्यात मंत्री असताना डॉ. कराड त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे चित्र होते; मात्र २०२० साली पंकजा यांनी औरंगाबादमध्ये स्वकीयांविरुद्ध जो एल्गार पुकारला त्यानंतर पंकजा पक्षापासून काहीशा दूर झाल्या. याचवेळी राजकीय दिशा डाॅ. कराड यांनी ओळखली आणि राज्यात भाजपमध्ये प्रभावी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढविली आणि त्याचा पुरेपूर फायदाही त्यांना झाला. भाजपमधून वंजारी समाजाच्या नेत्याला संधी द्यायची झाल्यास मुंडेंच्या घरात द्यायची नाही, या भाजपच्या राज्यातील नेत्यांनी घेतलेल्या धोरणाचाही डॉ. कराड यांना फायदा झाल्याचे दिसते.
जात आणि शिक्षण घटक ठरले महत्त्वाचेडॉ. कराड यांना मंत्रिपद मिळण्यामध्ये जात आणि त्यांचे वैद्यकीय उच्च शिक्षण हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे ठरले. मराठवाड्यातून ओबीसी घटकाला आणि विशेष करून वंजारी समाजाला प्रतिनिधीत्त्व देण्यासंदर्भाने भाजपमध्ये विचार झाल्यानंतर खा. प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. कराड यांना संधी देण्यात आली. शिवाय कोरोना काळात त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा व्हावा, या हेतूने त्यांची वर्णी लागली आहे.
मुलांचे डॉक्टर ते देशाचे केंद्रीय मंत्री
- औरंगाबादचे पेडियाट्रिक सर्जन असलेले डॉ. भागवत कराड यांनी १८ मार्च २०२० रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
- १६ जुलै १९५६ रोजी जन्मलेले डॉ. कराड हे १९७७ साली एमबीबीएस झाले. वाढदिवसाची ही जणू त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गिफ्टच मिळाली.
- एप्रिल २००० ते ऑक्टोबर २००१ आणि नोव्हेंबर २००६ ते ऑक्टोबर २००७ या काळात त्यांना महापौरपद भूषवण्याचा मान मिळाला. १९९७-९८ या काळात ते उपमहापौर होते. तीनदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले.
- २०१८ मध्ये डॉ. भागवत कराड हे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनले. अद्याप या मंडळावर नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली नाही.
- २००१ ते २००४ या काळात डॉ. भागवत कराड हे औरंगाबाद शहर भाजपचे अध्यक्ष होते. २०१० ते १३ या काळात भाजपच्या भटक्या विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१४ ते २०२० या काळात ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व सचिव बनले.
- चिकलठाणा लायन्स क्लब, भारतीय बाल रोग अकादमी, आएमए यासारख्या संस्थांवर त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली.