औरंगाबाद : कन्नड येथे सुरू असलेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादने मुलांच्या सांघिक गटातील फॉईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे मुलींच्या गटातही रौप्यपदकाची कमाई करताना या स्पर्धेत वर्चस्व राखले. सेबर प्रकारातही मुलींच्या संघाने रौप्यपदक जिंकले.मुलींच्या गटातील फॉईल प्रकारात नागपूरने औरंगाबादवर २०-१५ अशी मात करीत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे या गटात औरंगाबादला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या गटातील फॉईल प्रकारात मात्र, यजमान औरंगाबादने वर्चस्व राखताना नागपूरचा १५-३ असा दणदणीत पराभव करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सुवर्णपदक पटकावणाऱ्या औरंगाबादच्या संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, नुकत्याच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करणारा तुषार आहेर, हेमंत शिंदे यांचा समावेश होता. सेबर सांघिक मुलींच्या अंतिम सामन्यात पालघरने औरंगाबादवर १५-९ अशी मात करीत सुवर्णपदक पटकावले.इप्पी प्रकारातील मुलींच्या सांघिक गटात मुंबई उपनगरने १५-११ अशी अंतिम सामन्यात मात करीत विजेतेपद पटकावले. विजेतेपद पटकावणाºया संघात खुशी दुखंडे, हर्षदा कदम, रुचा दरेकर यांचा समावेश होता, तर उपविजेतेपद पटकावणाºया लातूरच्या संघात पायल स्वामी, माही आधारावाड, ज्ञानेश्वरी शिंदे यांचा समावेश होता. मुलांमध्ये इप्पी प्रकारात सांगलीने विजेतेपद पटकावताना कोल्हापूर संघावर १५-१० अशी मात केली.सांगली संघाकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू गिरीश जकाते, श्रेयस तांबवेकर, राम यादव यांनी प्रभावी कामगिरी केली, तर कोल्हापूरच्या संघात कुमार शिंदे, प्रतीक पाटील व ओंकार पाटील यांनी झुंजार खेळ केला. पदकविजेत्या संघांना क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष मानसिंह पवार यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, उपाध्यक्ष शेषनारायण लोंढे, प्राचार्य डॉ. विजय भोसले, अभय देशमुख उपस्थित होते.वैयक्तिक सामने उद्या, रविवारी सकाळी होणार असून, बक्षीस समारंभ भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे व ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अशोकराव आहेर, वसंतराव देशमुख, सुनील देशमुख, प्राचार्य डॉ. विजय भोसले, अभय देशमुख, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, प्रमोद देशमुख, दिनेश वंजारे यांची उपस्थिती असणार आहे.