औरंगाबाद: जिल्ह्यास मंत्रिपदासाठी अच्छे दिन आले आहेत. दोन केंद्रीय राज्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. तसेच विधानपरिषद विरोधी पक्ष नेतेपद देखील प्रथमच औरंगाबादच्या वाट्याला आले आहेत. पाच मंत्री आणि विरोधी पक्ष नेतेपद अशी 'पॉलिटीकल पॉवर' मिळाल्याने जिल्ह्याच्या विकास वाटा आता मोकळ्या होतील, अशा अवघ्या जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
एरव्ही एखादे मंत्रिपद जिल्ह्यात मिळाले तर भाग्य फळफळल्यासारखे वाटत असे; परंतु केंद्र शासनाचे दोन केंद्रीय राज्यमंत्री आणि आता राज्य सरकारमध्ये तीन कॅबिनेट मंत्री, तसेच म्हाडाचे राज्यमंत्री दर्जाचे सभापतिपद व विधान परिषद विरोधी पक्षनेतादेखील औरंगाबादचाच. अशी वैधानिक पदांची गर्दी औरंगाबादला झाली असून केंद्र व राज्याच्या सत्तापदांमुळे जिल्ह्यातील विकासाची वाट आता तरी सोपी होईल, अशी अपेक्षा आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात औरंगाबादचे स्थानकेंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात औरंगाबादला स्थान मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच ही संधी औरंगाबादला डॉ. कराड यांच्या रूपाने मिळाली. औरंगाबाद-जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे हेदेखील केंद्रात रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री आहेत. गेल्या वर्षी विस्तारात त्यांच्याकडे रेल्वे खात्याचे राज्यमंत्रिपद आले आहे.
राज्य मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्रीमहाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री, तर संदिपान भूमरे हे कॅबिनेट मंत्री होते. हे सरकार गेल्यानंतर आमदार सत्तारांचे ‘प्रमोशन’ झाले असून ते कॅबिनेट मंत्री झाले. भूमरेदेखील कॅबिनेट मंत्री झाले. शिवाय २०१९ साली सहा महिन्यांसाठी उद्योग राज्यमंत्री राहिलेले आ. अतुल सावे यांच्या रूपाने एका कॅबिनेट मंत्र्याची भर पडली आहे. जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री मिळण्याचा योग स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात पहिल्यांदाच आला आहे. तर संजय केणेकर हे म्हाडाचे सभापती आहेत. राज्यात सत्तेतील होणारी उपेक्षा मागील काही वर्षांपासून संपुष्टात आली आहे.
औरंगाबादला प्रथमच विरोधी पक्षनेते पदशिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे. दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे राज्याच्या राजपत्रात प्रसिद्ध झाले.जिल्ह्यास कधी नव्हे ती तब्बल पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. यातून राज्याची पर्यटन राजधानी व मराठवाड्याच्या राजधानीचा चेहरामोहरा बदलावा, अशी स्वप्ने नागरिकांना न पडली तरच नवल.